रायरेश्वर ! ऐतिहासिक स्वराज्य स्थापना शपथ दिवस हिंदूंसाठी अभिमान : श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे!


वाई कार्यकारी संपादक : आशिष चव्हाण

छत्रपती शिवाजी महाराजानी रयतेवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध संघर्ष करून स्वराज्याची स्थापना केली. याच स्वराज्यामध्ये त्यांनी समजातल्या सर्व घटकानां म्हणजेच मावळ्यानां एकत्र करून मोघलांची जुलमी राजवट उलथवून टाकण्याचा निर्धार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘चैत्र शुद्ध सप्तसमी’ १६४५ ला त्यांच्या सहकारी मावळ्यांसह परकीय राजवटीविरुद्ध श्री रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्या घटनेला आज ३७९ वर्षे पूर्ण होत आहेत. तो दिवस आपणा सर्वांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. महाराजानी दिलेल्या विचारांचा वारसा आपण सर्वानी पुढे नेताना प्रत्येक तरुणाने स्वतः मधील शिवाजी महाराज जागृत करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे उदयनराजे भोसले यांनी केले.

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘चैत्र शुद्ध सप्तसमी’ १६४५ ला आपल्या सहकारी मावळ्यांसह त्या काळातील परकीय आक्रमक राजवटीविरुद्ध श्री रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली .त्यानिमित्त सालाबादप्रमाणे भरगच्च आणि अनोख्या उपक्रमांचे आयोजन श्री क्षेत्र रायरेश्वर, रायरी येथे केले होते. या सोहळ्याच्या निमित्त बोलताना श्रीमंत छत्रपति दमयंतीराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजानी उभारलेल्या गड किल्ल्यांचे महत्व सांगितले. त्याचबरोबर श्री क्षेत्र रायरेश्वर तसेच राज्याचा वारसा असलेले गडकोट संवर्धन, जतन व शाश्वत पर्यटनाबाबत सर्वांनी एकत्रित येवून शिवरायांना अपेक्षित असलेले सुराज्य निर्माण करण्याचेही आवाहन केले.

ADVERTISEMENT

 

या दिनाचे औचित्य साधून रायरेश्वर ग्रामस्थ संस्था, बायोस्फिअर्स, ग्रामपंचायत रायरी, स्वराज्याभूमी प्रतिष्ठान, रायरेश्वर स्मारक समिती आणि अनेक महाराष्ट्रातील विशेषत: मावळातील सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हिंदवी स्वराज्य शपथ दिनानिमित्त रायरेश्वर येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. शंभू महादेव शिवलिंग जलाभिषेक व दुग्धाभिषेक, गड आणि ध्वज पूजन, मशाल मिरवणूक, छत्रपती शिवाजी महाराज पालखी मिरवणूक व शिवकार्यात योगदान देणाऱ्या प्रातिनिधिक संस्थांचा सन्मान तसेच ग्रामस्थांकडून सरदार घराण्यांचा सन्मान, श्री. संदीप खाटपे यांचे शिव-व्याख्यान, देव वृक्ष म्हणून सुपरिचित असलेल्या अजानवृक्ष, रुद्राक्ष, सुवर्णपिंपळ यांचे रोपण असे विविध उपक्रम साजरे झाले.

 

या सोहळ्यास श्री. महादेव मोहिते, उपवनसंरक्षक (प्रा.) पुणे, डॉ. नीलकंठ शिवाचार्य महाराज, डॉ. सचिन अनिल पुणेकर, श्री. युवराज राजे जेधे, श्री. दत्तात्रय जंगम, डॉ. दिगंबर मोकाट, श्री. अशोक सातपुते, श्रीमती शीतल राठोड, श्री. रवींद्र कंक, श्री. मंगेश शिळीमकर श्री. रवींद्र जंगम उपस्थितीत होते. तसेच हिंदवी स्वराज्य शपथ घेताना छत्रपती शिवरायांसोबत त्याकाळी असलेली सरदार घराणी, सहकारी मावळे यांचे वारसदार प्रतिनिधी आणि शिवविचारांनी प्रेरित असणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था, शिवप्रेमी, संत, अभ्यासक, अधिकारी, लोकप्रतिनिधी, साहित्यिक, कलाकार इ. मोठ्या संखेने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!