काळ भैरवनाथ यात्रेनिमित्त सारोळे गावात जय्यत तयारी.
सारोळे : भोर तालुक्यातील पुणे सातारा महामार्ग लगत असलेल्या सारोळे गावातील श्री काळभैरवनाथाची यात्रा उद्या रविवार दि.५ व ६ मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. यात्रेच्या आदल्या दिवशी यात्रेचे आमंत्रण देण्यासाठी काळभैरवनाथांची पालखी डोंगरातील महांगरेदरा मध्ये असलेल्या चिलावळी आईस आमंत्रण दिले जाते. त्याचबरोबर संध्याकाळी ७ वाजता काळभैरवनाथांची बहिण समजली जाणारी जानुबाई हिला सुद्धा आमंत्रण देण्यासाठी पालखी जाते. यात्रेच्या पहिल्या दिवशी काळभैरवनाथांचा पहाटे ५ वाजता अभिषेक काळभैरवनाथांचे पुजारी तुळशीराम गुरव यांच्याकडून केला जातो. अभिषेकाची सुरुवात काकड आरती पासून केले जाते. त्यानंतर गावातील पुरुष व महिला मंडळी, लहान थोर काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत मंदिरात दर्शनासाठी येतात. रात्री १० नंतर काळभैरवनाथांचा छबिना सुरू होतो त्यामध्ये पंचक्रोशीतील नामांकित ढोल लेझीम झाँज पथके, दांडपट्टा, सनई चौघडे येतात. आपले कला कौशल्य दाखवून सर्व यात्रेकरूंना मंत्रमुग्ध करतात सर्व कलाकार खेळ गड्यांना यात्रा कमिटी मार्फत योग्य इनाम दिला जातो पहाटे पालखीची मिरवणूक सर्व गावांमधून काढली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी ९:३० वाजता कमल वनिता कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा असतो. त्यानंतर भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचा आखाडा सुरू होतो. त्यामध्ये १ नं कुस्तीला रूपाली साईनाथ धाडवे ( सारोळे सरपंच ) यांस कडून चांदीची गदा इनाम म्हणून रक्कम रुपये यात्रा कमिटीतर्फे दिली आहे. त्यानंतर महिला वर्गासाठी यात्रेच्या तिसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम महिला वर्गासाठी केला जातो. त्यानंतर यात्रेची सांगता होते.

