महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत जागावाटपासंदर्भात चर्चा; विधानसभेसाठी महायुतीची रणनिती ठरली?
सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी
– विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. बैठका, दौरे, जाहीर सभा सुरु आहेत. महायुतीचे नेते देखील पुन्हा राज्यात आपलीच सत्ता आणायची या उद्देशाने कामाला लागलेत. दरम्यान, काल रात्री उशीरापर्यंत महायुतीच्या नेत्यांची नागपुरात महत्वाची बैठक पार पडली. विदर्भासह संपूर्ण राज्याच्या महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात सखोल चर्चा झाली. अनेक जागांबद्दल तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये एकमत होऊन चांगली प्रगती देखील झाली आहे.
महायुतीच्या महत्त्वाच्या नेत्यांची विशेष बैठक नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी रात्री झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भातून महायुतीचे इतर काही नेते देखील उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती या बैठकीमध्ये ठरवण्यात आली. इतकंच नाहीतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे, संवाद दौरा, प्रत्येक मतदारसंघात सभा घेण्याचा निर्णयही या तिनही नेत्यांमध्ये झाला.
बैठकीत राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या तिकीट वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विद्यमान आमदारांचे मेरीट तपासून त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला गेल्याची चर्चा आहे. तसेच महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदारसंघात महायुतीचा दूसऱ्या क्रमांकाचा कोण सक्षम उमेदवार आहे? याचीही चाचपणी करून चर्चा झाली. त्याचप्रमाणे राज्यात ज्याप्रमाणे वातावरण सुरू आहे आणि विरोधी पक्षाकडून होत असलेल्या टिकेला उत्तर देण्यासंदर्भात सुद्धा चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीतील घटक पक्षांना किती जागा सोडता येऊ शकते? कोणत्या जागा दिल्या जाऊ शकतात या संदर्भात विचारविनिमय झाला. तसेच गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांनी केलेली वादग्रस्त विधाने चर्चेत आहेत. त्यावरही या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.


