सध्याची व्यसनाधिन तरुणाई जबाबदार कोण


 

मी आपणा सर्वांशी व्हॉट्स ॲप चे माध्यमातून माझे लिखाणातून वर्तमान काळात सध्याची तरुणाई ही चुकीच्या मार्गाने जात आहे.त्यांना वाईट सवयी म्हणजे दारू,गुटखा, चरस,अफू,गांजा,किरकोळ कारणावरुन खून, मारामारी दरोडे असे प्रकार होत असून यामध्ये आपण पालक म्हणून कुठे कमी पडलो आहोत.याविषयी थोडक्यात माझे मत व्यक्त करीत आहे.

 

सध्याची तरुणाई ही वाईट सवयींच्या आधीन झालेली आहे,त्यांना आपण यातून कसे बाहेर काढू शकतो

आपण पाहतो,आजकाल सध्याची तरुणाई ही वाईट गोष्टींच्या मार्गाने जात आहे.या तरुणाई कडून वाईट सवयी म्हणजे दारू, चरस,गांजा,अफू,किरकोळ कारणावरुन खून, मारामारी,चोऱ्यामाऱ्या,दरोडे असे प्रकार सर्रास घडताना आपण पाहतो.या मागील कारणे आपण पालक म्हणून कधी शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? आपण पालक म्हणून कुठे कमी पडलो आहोत,याचा आपल्या अंतर्मनाने विचार होणे गरजेचे आहे.मानव जातीय अभ्यासक सांगतात की,नुकतेच जन्माला आलेले मुल आमच्याकडे द्या,ते आम्ही घडवतो.मातीच्या गोळ्याला जसा आकार दिला जातो,तसेच मुलांना लहान वयातच आकार देऊन म्हणजेच त्यांना संस्कारक्षम घडवू.मुलांशी सकारात्मक संवाद म्हणजे लक्ष देणे, मुलाच्या भावनांचा आदर करणे.आपण आपल्या कामामध्ये खुप व्यस्त असल्यास, आपल्या मुलाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी दररोज थोडा थोडा वेळ द्या.तसेच मुलांचे मित्र मैत्रिणी,शिक्षक,इतर सहकारी यांचेबाबत मुलांशी वरचेवर आपण स्वतः संवाद साधावा.आपण मुलांचे आई वडील नसून आपण मुलाचे सर्वात जवळचे मित्र मैत्रिणी आहोत,याची जाणीव आपल्या वागण्या बोलण्यातून मुलांना जाणवून द्या.मुलांनी छोट्या छोट्या कामात आपल्या आई वडिलांना मदत केली तर आपल्या मुलांना उलट सुलट न बोलता त्यांना त्यांचे कामाप्रती प्रोत्साहन द्या,आणि भरपूर स्तुती करा.कदाचित तुमच्या प्रोत्साहनामुळे त्याला आणखी काम करण्याची उमेद वाटेल.चार चौघात त्याने केलेल्या छोट्या मोठ्या कामांचे कौतुक करा.

आपण पालकत्वाची जबाबदारी घेतो म्हणजे नक्की काय करतो,काहीजण सांगतात, या व्यस्त कामातून आम्हाला वेळ मिळत नाही,सकाळ पासून रात्री उशिरा पर्यंत काम चालते अशी आणि आणखी काही कारणे ठरलेली असतात.पण ही आपण आपली जबाबदारी टाळण्याची कारणे आहेत असे मला वाटते.मुलांचे अती लाड करू नका. गरजे पुरतेच लागणाऱ्या गोष्टी मुलांना द्या.मुलांशी संवाद साधा, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना त्यातून बाहेर काढून ज्या त्या वेळी त्यांच्या कडून झालेल्या चुका एखाद्या उदहरणा व्दारे पटवून द्या.मुलांच्या आपण अडीअडचणी सोडविल्यास त्यांना आपल्याविषयी आदराची आणि आपुलकीची भावना निर्माण होऊ लागते.आपला मुलांशी होत असलेला सकारात्मक संवाद,चर्चा हाच त्यांना चांगल्या मार्गाने जाण्याचा रस्ता आहे.पालकांचा मुलांशी संवाद होत नसलेले आजच्या तरुणाईला स्मार्टफोनची देखील भुरळ पडलेली दिसत आहे.व्हॉट्स ॲप, फेसबुक, इंस्टाग्राम,twitar, स्नॅप, टेलिग्राम असे नवनवीन ॲप वापरताना ही तरुणाई दिसत आहेत.या सर्व ॲप मूळे, इंटरनेट मूळे मुले तसेच पालकांमध्ये होत नसलेल्या संवादामुळे पालक आणि मुलांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.आपण पालक तसेच एक जबाबदार नागरिक म्हणून या तरुणाईला नवनवीन उपक्रम राबवून या सर्व गोष्टी पासून बाहेर काढू शकतो,उदा. कॉलनी कट्टा,गाव कट्टा आपल्या परिसरानुसार जसे गणपती नवरात्र उत्सव साजरे करतो त्याप्रमाणे दर महिन्याला मुलांच्या कला गुणांना वाव मिळतील म्हणजे चांगल्या विषयांवर चर्चासत्र,गोष्टी,नाटक,विविध प्रकारचे खेळ तसेच वेगवेगळे प्रबोधनपर व्याख्याने असे उपक्रम राबवून त्यातून त्यांना पारितोषिक मिळाले,तर मुलांना या सर्वांचे विषयी गोडी वाटू लागेल.मुलांना अशा उपक्रमामुळे आपलेआई वडील/आपले कॉलनी/परिसरातील/गावातील लोकांचे विषयी प्रेम,आदर वाटू लागेल,तसेच स्वतः मध्ये कमालीचा आत्मविश्वास वाढेल.आपण आपल्या मुलांना जितकं जास्त जपाल,तितके मुलांना तुम्ही जास्त कमकुवत कराल.निसर्गाने त्यांना लढण्याची ताकद दिली आहे.त्यांचे खच्छीकरण करू नका.त्यांना ऊन,वारा,पाऊस सर्व काही सोसू द्या.मग त्यांचे आयुष्यात कितीही वादळे आली तरी ते भक्कमपणे उभे राहतील.

ADVERTISEMENT

मुलं असो किंवा मुली त्यांना तारुण्यात पदार्पण करताना वेगवेगळ्या शारीरिक बदलांना सामोरे जावे लागते.हा बदलाचा काळ म्हणजे ना बालपण ना तरुणपणात असण्याचा कालावधी.या कालावधीला आपण पौगंडा अवस्था असे म्हणतो.या काळात मुलांची मानसिक,भावनिक अवस्था समजून घेणं गरजेचं असते.कारण याच कालावधीत त्यांचे मध्ये होणाऱ्या शारीरिक बदलामुळे त्यांची चिडचिड वाढलेली असते.म्हणून याच कालावधीत आपल्या मुलांना मित्र/मैत्रीण म्हणून त्यांचेशी हितगुज करणे गरजेचे असते.या कालावधीत मुलांना आई वडिलांचे प्रेम नाही मिळाले तरी ही मुले चुकीच्या वळणाला लागतात.म्हणून त्यांना मानसिक भावनिक धीर द्या.

 

*पालक आणि मुलांमधील होत नसलेल्या संवादाचे कारण आणि त्यावर पर्याय* –

स्मार्टफोनचे अती वापरण्यामुळे पालक व पाल्य यांचे मध्ये संवाद होत नाही.घरात,बाहेर,कट्ट्यावर, ग्राउंड वर,कुठेही बसले तरी प्रत्येकाचे हातात स्मार्टफोन असतात.अन तासनतास ते इंस्टाग्राम यावरील रिल्स, फेसबुक,स्नॅप, टेलिग्राम असे नवनवीन ॲप चालविण्यात त्यांना मजा वाटू लागते.पब्जी सारखे गेम ज्यामुळे मुलं आत्महत्या करायला लागली आहेत.

आपल्या मुलांना या सर्वांमधून बाहेर काढायचे असेल आणि एक सुसंस्कृत,हुशार, होतकरू,आदर्श,कष्टाळू पिढी घडवायची असेल तर शाळा कॉलेज अगर कामाचे ठिकाणी जाताना व घरी आल्यानंतर त्यांचेशी संवाद साधत राहणे,त्यांचे बरोबर दंगा,मस्ती करणे,मैदानी गेम खेळणे,सकाळी नाही जमले तरी रात्री एकत्र बसून जेवण करणे,त्यांचे मेंदूला चालना मिळतील असे नवनवीन उपक्रम राबवावेत. मुलांना व्यायाम,योगा,प्राणायाम तसेच मेडीटेशन इत्यादीच्या सवयी लावल्या तर त्यांचे शारीरिक स्वास्थ्य सुधारण्या बरोबरच मानसिक स्वास्थही उत्तम राहण्यास मदत होईल. मेडीटेशन केल्याने आपल्या मनावर ताबा ठेवता येतो,आकलन क्षमता वाढते.लहान वयापासून सुरुवात केली तर मेडीटेशनचे खुप फायदे मुलांमध्ये पाहायला मिळतील.आपण आपल्या मुलांचे बरोबर आपल्या सर्व गोष्टी शेअर केल्या तर मुले देखील त्यांचे बाबतीतील सर्व चांगल्या वाईट गोष्टी आपल्या बरोबर शेअर करतील.घरातील वातावरण नेहमी हसत खेळत ठेवले तर मुलं आपल्या पाल्याचे बरोबर नक्कीच संवाद साधतील.तसेच आपल्या देशामध्ये ज्या ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या आहेत(उदा. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राजमाता जिजाऊ,इतर महान व्यक्ती) त्यांचा इतिहास आपल्या पिढीला माहिती असणे खूप गरजेचे आहे.त्यांना दररोज वाचनाची/ चांगल्या गोष्टी ऐकण्याची सवय लावली तर आपणही काम करीत करीत मुलांना महान व्यक्तींच्या कथा सांगू शकतो, ऐकवू शकतो.वेळीच मुलांना स्मार्टफोन, टॅब,laptop यासारखी आधुनिक उपकरणे ही गरजेपुरते वापरून त्याचा अतिवापर होऊ नये,तसेच त्यांना इतर वाईट सवयींचे व्यसन लागू नये, यासाठी पालकांनी वर सांगितलेल्या गोष्टींचे बाबतीत सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे. येणारी पिढी घडविणे हे प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीचे, पालक वर्गाचे तसेच शिक्षकांचे काम असून त्या दृष्टीने येणारी पिढी घडवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. नाहीतर येणार्या पिढीला स्मार्टफोनचे अती वापरामुळे तसेच त्यांना लागलेल्या वाईट सवयींमुळे होणाऱ्या दुष्परिणामांना मुलांना परिणामी आपण पालक म्हणून आपल्याला देखील सामोरे जावे लागेल. येणाऱ्या पिढीचे भवितव्य हे आपणच घडू शकतो,हे सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.आणि *हेच खरे पालकत्व आहे,असे मला वाटते

प्रमिला शरद निकम

पोलीस हवालदार राजगड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!