चालू खांबावरील तार अंगावर पडून शॉक लागून २ बैला पैकी एका बैलाचा मृत्यू! तांबाड गावातील घटना
नसरापूर : भोर तालुक्यातील तांबाड गावात शनिवार दि. २७ रोजी चालू विद्युत तार अंगावर पडल्याने दोन बैलांपैकी एका बैलाचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर विद्युत विभागावर ग्रामस्थ संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
तांबाड गावात आज सकाळच्या सुमारास शेतकरी बारकू सोंडकर हे त्यांच्या बैलांना घेऊन भात शेतीचा चिखल करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक एका बैलावर चालू विद्युत तार अंगावर पडून विद्युत झटका लागला आणि बैल जागेवरच खाली पडला. यावेळी शेतकरी बारकू सोंडकर यांनी महावितरण कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून विद्युत प्रवाह बंद करण्यास सांगितले. कर्मचारी वायरमन यांनी घटनास्थळी धाव घेत वीज पुरवठा बंद केला . या घटनेनंतर प्रशासनाच्या वतीने तलाठी आणि राजगड पोलिसांनी येऊन पंचनामा केला. त्यानुसार राजगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला.
या घटनेनंतर महावितरणाच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला असून नुकसान भरपाई ची मागणी केली आहे.

 
			

 
					 
							 
							