मोरवाडीतील गाडगे बंगल्याजवळ बिबट्याची दहशत
भोर तालुक्यातील मोरवाडी गावात बिबट्याच्या हालचाली वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास मोरवाडी येथील गाडगे बंगल्याजवळ बिबट्याने लोकांसमोरूनच एका कुत्र्याला उचलून नेल्याची घटना घडली.
ही घटना प्रत्यक्ष पाहिल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून, बिबट्या रानाकडे जाताना दिसून आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, लहान मुले, महिला व वृद्ध नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर जाणे टाळावे, शेतात किंवा रानाच्या परिसरात जाताना टोर्च, काठी सोबत ठेवावी, तसेच कुत्री व पाळीव जनावरे मोकळी सोडू नयेत, अशा सूचना ग्रामस्थांनी एकमेकांना दिल्या आहेत.
वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन परिसरात गस्त वाढवावी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
नागरिकांनी रानाच्या दिशेने जाताना अत्यंत सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.


