श्री क्षेत्र बनेश्वर रस्त्याचे भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते संपन्न.
संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
२ कोटी ४१ लाखांच्या निधीतून रस्त्याचे काम होणार; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
दि. 8 जून नसरापूर ( भोर)– स्थानिक ग्रामस्थांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर श्री क्षेत्र बनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. (दि.7) खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे विधिवत भूमिपूजन पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, कार्यकर्ते व प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
शासनामार्फत या रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ४१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण करून भाविकांसाठी रस्ता सुकर करण्याचे उद्दिष्ट आहे.
सातत्याने पाठपुरावा – उपोषणानंतर यश
या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक वर्षांपासून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता. खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देत सतत प्रशासनाशी पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांनी ९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यांच्या या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला आणि अखेर शासनाने निधी मंजूर केला.
पूजा-अर्चा करून शुभारंभ
भूमिपूजनाआधी खासदार सुळे यांनी श्री क्षेत्र बनेश्वर मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा केली व मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर विधिवत पूजा करून रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
ग्रामस्थ व भाविकांत समाधान
रस्त्याचे काम सुरू झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. “खासदार सुळे यांच्या अथक प्रयत्नामुळे हे शक्य झाले,” असे भाविकांनी सांगितले. अनेकांनी त्यांचे आभार मानले आणि काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.


