राज्यस्तरीय बाल रक्षक कार्यगौरव पुरस्कार 2025 अनिल चाचर यांना नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान
नाशिक प्रतिनिधी :-शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून दर्जेदार शिक्षण देणे हे आपली जबाबदारी आहे आणि शिक्षण हमीपत्रकाची अंमलबजावणी केली तर शंभर टक्के मुले शिक्षण प्रवाहात येतील असे विचार पूर्व शिक्षण संचालक डॉ.शोभा खंदारे यांनी मांडले. अनिल चाचर यांना शाळाबाह्य मुलांचे गुरुजी म्हणून ओळखतात त्यांचे रायगड जिल्ह्यातील आदिवासी मुलांसोबतचे काम,पुणे जिल्ह्यातील डोंबारी,पारधी,वंचित समूहातील शाळाबाह्य मुलांचे सोबतचे काम, स्थलांतरित मुलांसोबतचे काम राज्यभर गाजले त्यांचे विविध लेख प्रकाशित झाले आहेत.त्यांनी पंधराशे च्या पुढे शाळाबाह्य मुले शिक्षण प्रवाहात आणली आहेत.अनेक बालविवाह रोखले, बालमजूर मुले शिक्षण प्रवाहात आणून शिक्षणाची जबाबदारी उचलली.
त्यांना तत्कालीन शिक्षण आयुक्त धीरज कुमार साहेबांच्या आदेशाने टाटा ट्रस्ट सोबत ऊसतोड कामगार मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षक मार्गदर्शक म्हणून उच्चतम काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी शेकडो मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून दिली. शेकडो शाळांना CSR मधून मदत मिळवून दिली. हजारो मुलांना CSR मधून शिक्षणासाठी साहित्य उपलब्ध करून दिले.त्यांनी ओरिसा,राजस्थान,केरळ राज्यात अभ्यास दौरे केले.
कोरोना काळात केलेले त्यांचे काम अद्वितीय होते.
त्यांच्या बेटी बचाव,बेटी पढाव या उपक्रमाचे सूचना व प्रसारण मंत्रालय,भारत सरकार,दिल्ली यांच्यावतीने सन्मानपूर्वक कौतुक करण्यात आले. त्यांनी ग्रामविकासासाठी लाखोंचा CSR ग्रामीण भागात मिळवून दिला.त्यांमुळेच 2 लक्ष 50 हजार रु.चा राज्यस्तरीय सेवादीप पुरस्कार त्यांना शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी मिळाला.
वंचित शाळाबाह्य मुलं शिक्षणाच्या प्रवाहात यावीत,टिकावीत, गुणवत्तापूर्ण शिकावीत ही भावना चाचर गुरुजींची सातत्यपूर्ण कामाची पावती देते. प्रश्नांना भिडणे हा त्यांचा स्वभाव तर यश मिळेपर्यंत न थांबणे हा त्यांचा प्रभाव.त्यांनी स्वखर्चातून पारधी कुटुंबातील दोन मुले पोलीस बनवण्यात यश मिळवले आहे.
त्यांच्या कार्याची दखल SCERT, डाएट, जिल्हा परिषद पंचायत समिती विविध सामाजिक संस्था ट्रस्ट यांनी घेतली असून शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे. किनो एज्युकेशन सोसायटी एकात्मतेचे प्रतीक असलेली समतामूलक विचारधारेतून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणारी संस्था असून बाल रक्षक चळवळ गतिमान करण्यासाठी कार्यरत आहे.
कार्यक्रमाला टी डी आर एफ चे संचालक मा. हरिश्चंद्र राठोड,पूर्व शिक्षण उपसंचालक मा. डॉ.शोभा खंदारे-पवार, पूर्व शिक्षण सहसंचालक मा ई जे ठाकरे, शिक्षणाधिकारी मा डॉ सुचिता पाटेकर,पूर्व शिक्षणाधिकारी पोपटराव काळे किनो एज्युकेशन सोसायटीचे मा.रईस शेख मा.अनिल जाधव,सचिन सोनवणे, रजनीकांत सोनवणे, गणेश कोंडे,शरद सोनवणे,शिवाजी सोनवणे,पूनम सोनवणे, रूपाली चाचर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत काळे यांनी केले सूत्रसंचालन संदीप वाकचौरे यांनी केले तर विनोद राठोड यांनी मान्यवरांचे आभार मानले

