ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्पर्श सेतू संस्थेचा उपक्रम! न्हावी शाळेत १११ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
मंगेश पवार
न्हावी (ता. भोर) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी स्पर्श सेतू संस्थेच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, न्हावी येथे सलग दुसऱ्या वर्षी शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमात एकूण १११ विद्यार्थ्यांना वह्या, कंपास पेटी, पेन, पेन्सिल, खोडरबर, चित्रकला वही, रंगपेटी आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आनंदाने हे साहित्य स्वीकारले व संस्थेप्रती आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष महेश यादव व उपाध्यक्ष भागवत बोराडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले आणि शिक्षकांचेही कौतुक केले.
विशेषतः अध्यक्ष महेश यादव यांनी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात शंभर टक्के विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह संपूर्ण शैक्षणिक साहित्य देण्याचे आश्वासन दिले, जे उपस्थित पालक व शिक्षकांसाठी आनंदाची बाब ठरली.
उपक्रमाच्या यशस्वीतेमागे अनिल चाचर यांचे विशेष प्रयत्न असून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट दिसून आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली पिसाळ यांनी केले. सूत्रसंचालन सोनाली बोन्द्रे यांनी केले तर संदिप मोरे यांनी आभार प्रदर्शन केले.
शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद व पालकांनी स्पर्श सेतू संस्थेचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

 
			

 
					 
							 
							