शिक्षक शशिकांत धाडवे व विद्यार्थ्यांच्या प्रसंगावधानाने भेकराला जीवनदान!
मंगेश पवार
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
दि. 31 कापूरहोळ(ता. भोर) – आदर्श माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका जखमी भेकर जातीच्या हरणाचे प्राण वाचले. डोंगर उतारावर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या या हरणाला वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी घेतलेली तात्काळ कृती कौतुकास्पद ठरली आहे.
विद्यालयाचे विद्यार्थी हर्षद खाटपे, सार्थक मिसाळ, आदित्य मिसाळ आणि राहुल नांदघुरे यांनी डोंगर उतारावर कुत्र्यांनी भेकरावर हल्ला करत असल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी ही माहिती तत्काळ शशिकांत धाडवे यांच्यासह भोंगळे सर, टेळे सर, विलास टिळेकर आणि मुख्याध्यापक दीपक गायकवाड यांना दिली.
या घटनेत शशिकांत गुणाजी धाडवे सरांनी विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम जागृत करून, त्यांच्या सूचना गांभीर्याने घेत तात्काळ कृती केली. त्यांनी इतर शिक्षकांशी समन्वय साधून जखमी हरणाला सुरक्षित विद्यालयात आणण्याची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच सर्व विद्यार्थी एकत्र येऊन जीव वाचविण्यात यशस्वी ठरले. शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता व पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणारे धाडवे सरांचे हे योगदान अत्यंत प्रेरणादायी आहे.
शिक्षक व विद्यार्थी यांनी मिळून कुत्र्यांना हुसकावले व जखमी भेकराला विद्यालयात आणून प्राथमिक उपचार केले. त्यानंतर वन विभागाशी संपर्क साधण्यात आला. वनरक्षक अक्षय लव्हाळे, वनसेवक रघुनाथ मिसाळ व चालक रणजीत चव्हाण यांनी तत्काळ विद्यालयात हजर राहून पुढील उपचारासाठी भेकराला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन गेले.
मुख्याध्यापक गायकवाड सर व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या जागरूकतेचे व शाळेच्या शिक्षकांचा समन्वय याचे भरभरून कौतुक केले.

 
			

 
					 
							 
							