आदर्श शिक्षिका ; सौ.मंगल तुकाराम शेलार.
सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी
मेढा :- सौ.मंगल तुकाराम शेलार या जावली तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या वागदरे या गावच्या त्यांचे माहेर सातारा तालुक्यातील कळंबे हे असून सासर जावली तालुक्यातील वागदरे हे आहे. त्यांचे वडील श्री नारायण भोसले हे सैन्य दलात असल्यामुळे घरात शिस्तीचे वातावरण होते. वडीलांना शिक्षणाचे महत्त्व माहिती असल्यामुळे त्यांची सर्व भावंडे उच्चशिक्षित आहेत. त्यांचा मोठा भाऊ श्री. प्रदीप भोसले यांच्याकडून शिक्षण पूर्ण करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण कळंबे या गावी पूर्ण झाले शिक्षणात खऱ्या अर्थाने गोडी आणण्याचे काम त्यांचे प्राथमिक शिक्षक श्री. पाटील सर व श्री. अनिल जायकर सर यांनी केले. प्राथमिक शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश संपादन केले त्यावेळी इयत्ता सातवी मध्ये होणाऱ्या केंद्रस्तरावरील वार्षिक परीक्षेत केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला व तिथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख वाढत गेला. त्यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण हे किडगाव येथे पूर्ण केले. सातारा या ठिकाणी बारावीची परीक्षा उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर वडीलांनी सायन्सला प्रवेश घ्यायला सांगितले असताना देखील त्यांचे शिक्षक श्री.जायकर सर यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी डी.एडला प्रवेश घेण्याचे ठरवले. बारावी परीक्षेत मिळालेल्या उत्कृष्ट गुणांमुळेच सातारा येथील जिजामाता अध्यापिका विद्यालयात सहज प्रवेश मिळाला.डी.एड पूर्ण होताच जावली तालुक्यातील श्री तुकाराम शेलार यांच्याशी विवाह संपन्न झाला. लग्नानंतर लगेचच त्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असणाऱ्या गोरड म्हसवली या गावी प्राथमिक शिक्षिका म्हणून हजर झाल्या. खरंतर नोकरी मिळाल्याचा आनंद तर होताच परंतु दुसऱ्या जिल्ह्यात नोकरी करणे म्हणजे तारेवरची कसरत होती. त्यांचे सासर व माहेर येथील सर्वांची त्यांना उत्तम साथ लाभली. एकत्र कुटुंब असल्यामुळे नोकरी उत्तम प्रकारे करण्यासाठी त्यांना मोठ्या बहिणी प्रमाणे साथ लाभली ती त्यांच्या मोठ्या जाऊबाई सौ. सुमन शेलार यांची. त्यांचे सासरे वागदरे गावचे माजी सरपंच श्री. ज्ञानदेव शेलार यांची प्रेरणा व प्रोत्साहन असल्यामुळे त्या काळातअतिशय उत्कृष्ट रित्या त्यांचे शैक्षणिक कार्य त्या करू शकल्या.तब्बल चार वर्षाच्या अथक प्रयत्नातून त्यांची जिल्हा बदली त्यांच्याच गावाजवळ असणाऱ्या म्हाते बुद्रुक या गावी झाली तेथे अध्यापनाचे कार्य सुरू असताना शाळेला गुणवत्तापूर्ण शाळा स्पर्धेत तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला.तसेच त्यानंतर स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेत जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांक मिळाला. त्यावेळी होणाऱ्या एस.टी.एस परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडवले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्पर्धेत जिल्हास्तरावर विविध बक्षीस मिळाली.शाळेला ISO मानांकित करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यानंतर त्यांची बदली बिभवी या शाळेत झाली त्या शाळेतही विविध उपक्रम व विविध क्रीडा स्पर्धा मध्ये जिल्हास्तरीय यश मिळवले. पुढे त्यांची बदली करंजे या शाळेत झाली.तिथेही त्यांनी स्वतःच्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांमध्ये बालनाटय तालुकास्तर द्वितीय व विविध क्रीडास्पर्धा प्रकारात तालुका व जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले.शिक्षकांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धांमध्ये सन २०१८ – १९ मध्ये पी.पी.टी प्रेझेंटेशन स्पर्धेत तालुकास्तर द्वितीय क्रमांक पटकावला तसेच लॉकडाऊनच्या काळात थँक्स टीचर उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या स्वरचित कविता सादरीकरण स्पर्धेत तालुकास्तरीय तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. त्यांना कविता लेखनाचा छंद आहे व तो आजही जोपासत आहेत.शाळा पातळीवर विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे व्रत अविरतपणे चालूच राहणार असल्याचे त्या आवर्जून सांगतात.नृत्य – नाट्य यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन व संधी मिळवून दिली अशा विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून मिळणाऱ्या शैक्षणिक उठावातून शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात आला. या शैक्षणिक कार्यात त्यांना खंबीरपणे साथ देणारे त्यांचे पती श्री. तुकाराम शेलार हे सध्या मामुर्डी शाळेत कार्यरत असून त्यांची प्रेरणा व प्रोत्साहन नेहमीच मिळत असल्याचे त्या सांगतात. त्यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित आहेत. मोठी मुलगी प्राजक्ता ही बी.ए. एम. एस. चे शिक्षण पूर्ण करत आहे तसेच मुलगा चैतन्य इंजीनियरिंग चे शिक्षण पूर्ण करत आहे.
सर्व शिक्षक गुरुजनांना शिक्षक दिनाच्यामनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
बजरंग चौधरी. पत्रकार पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज.