कोंढव्यात धक्कादायक घटना! अभियंता तरुणीवर कुरिअर बॉयने केला बलात्कार – चेहऱ्यावर स्प्रे फेकून साधला डाव
पुणे | प्रतिनिधी:- संभाजी पुरीगोसावी
पुणे शहरातील कोंढवा परिसरात उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या संगणक अभियंता तरुणीवर कुरिअर बॉयने बलात्कार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना बुधवारी (२ जुलै) सायंकाळी घडली आहे. या घटनेमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पीडित तरुणी ही कल्याणीनगर येथील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरीस आहे. ती गेली दोन वर्षांपासून कोंढवा परिसरातील एका गृहनिर्माण संकुलात भावासह राहत होती. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला असताना, घरात एकटी असल्याची संधी साधून आरोपीने “कुरिअर घेऊन आलो आहे” या बहाण्याने दरवाजा उघडून घेतला. त्यानंतर पीडितेच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या घटनेनंतर तरुणीने तत्काळ पोलीस ठाण्यात संपर्क साधून तक्रार दिली. तिच्या फिर्यादीनुसार, आरोपी वय अंदाजे २८ ते ३० वर्षांचा असून, त्याने अत्याचार केल्यानंतर तरुणीचे छायाचित्र मोबाईलमध्ये घेतले आणि “मी परत येईन” असा धमकीवजा संदेशही मोबाईलमध्ये दिला.
घटनेची गंभीरता लक्षात घेता परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे व कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू आहे. संबंधित सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि परिसरातील माहिती गोळा करून तपास सुरू करण्यात आला आहे.
या घटनेपूर्वीही बोपदेव घाट व स्वारगेट परिसरात अशाच प्रकारच्या गंभीर घटना घडल्या असून, त्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत समाजात अस्वस्थता पसरली आहे.
दरम्यान, शहरी भागात महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन किती दक्ष आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे.


