आपलं आळजापूर…! एक गाव, एक विचार, एक ध्येय
प्रतिनिधी, दिलीप वाघमारे,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला अनेक ठिकाणी सत्तेची मक्तेदारी व गटबाजी पाहायला मिळते. मात्र आळजापूर या गावाने एक वेगळीच दिशा दाखवत मनाचा मोठेपणा दाखवला आहे.
भाजप नेते विलासराव नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली, गावाने एकता आणि विकासाचे दर्शन घडवत पवार मळा या भागाला पहिल्यांदाच सरपंच पदाचा बहुमान दिला. नवनियुक्त सरपंच पुष्पा पवार यांच्या नेतृत्वाखाली गावाने “आपलं आळजापूर” या संकल्पनेतून एक विचार, एक दिशा, आणि एक ध्येय ठेवून पुढे जाण्याचा निर्धार केला आहे.
माजी सरपंच शुभम नलवडे यांनी त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण गावासाठी “एक गाव – एक उपाय” हा दृष्टिकोन ठेवत काम केले. प्रत्येक वॉर्डाशी ऋणानुबंध टिकवत, विकासकामांची मालिका उभारली. सरपंच पदातून मुक्त होताना त्यांनी व्यक्त केलेल्या भावना म्हणजे गावकऱ्यांशी असलेली आत्मीयता आणि बांधिलकी याचेच प्रतिक आहे.
आज अनेक ठिकाणी सत्ता मिळाली की ती शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न होतो, पण आळजापूरने सत्तेचा मोह बाजूला ठेवत लोकशाही मूल्यांचा आदर्श ठेवला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात संपूर्ण गाव एकत्रितपणे बिनविरोध निवडणूक घडवून आणेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवनियुक्त सरपंच पुष्पा पवार यांच्यासह ग्रामस्थांनी “आपलं आळजापूर” या नावाखाली एकत्र येत सामूहिक फोटोसेशन केले. ही एकजूट हीच आळजापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठीची पहिली पायरी ठरणार आहे.
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज तर्फे नवनियुक्त सरपंचांसह सर्व ग्रामस्थांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

 
			

 
					 
							 
							