तुकाराम मुंढेंची पुन्हा एकदा बदली; ओंमकार पवार नाशिकचे नवे CEO
नाशिक प्रतिनिधी: अनुजा कारखेले| पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच महायुती सरकारकडून प्रशासनात मोठे फेरबदल सुरू आहेत. राज्य सरकारने मंगळवारी पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, यात ज्येष्ठ आणि चर्चित सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे.
तुकाराम मुंढे यांच्याकडे यापूर्वी असंगठित कामगार विभागाचे विकास आयुक्त म्हणून जबाबदारी होती. आता त्यांची बदली करून दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील ही २४ वी बदली ठरली असून, गेल्या २० वर्षांतील बदलीचा हा विक्रमच म्हणावा लागेल. सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या आदेशानुसार, त्यांना तत्काळ नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर अखेर IAS ओंमकार पवार (तुकडी 2022) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेल्या आशिमा मित्तल यांची जिल्हाधिकारी म्हणून जालना येथे बदली करण्यात आली होती, तेव्हापासून हे पद रिक्त होते. गेल्या काही महिन्यांत तीन आयएएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती, मात्र अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पसंतीने ओंमकार पवार यांना संधी देण्यात आली आहे.
प्रशासनातील या बदलांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीचा राजकीय आणि प्रशासकीय पटल अधिकच रंगतदार झाले आहे. आता नवीन पदांवर कार्यभार स्विकारल्यानंतर तुकाराम मुंढे आणि ओंमकार पवार काय बदल घडवून आणतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


