वेळवंड (ता.भोर) येथे बनावट मृत्यू दाखला प्रकरण ग्रामसेवकाच्या सही-शिक्क्यासह बनावट दाखला तयार – शासनाची फसवणूक
मंगेश पवार
भोर :- तालुक्यातील वेळवंड ग्रामपंचायतीत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. संभाजी रामजी पांगुळ यांच्या नावाने बनावट मृत्यू दाखला तयार करून शासन व ग्रामस्थांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणाबाबत शिव प्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते आणि सुनिता काळे बळीराजा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष पुणे यांनी १६ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे ग्रामीणचे मा. पोलीस अधीक्षक, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे तसेच भोर पोलिस ठाण्याचे मा. पोलिस निरीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
माहिती अधिकाराखाली करण्यात आलेल्या चौकशीत ग्रामसेवक वेळवंड यांनी स्पष्ट केले की, संबंधित व्यक्तीच्या मृत्यूची कोणतीही नोंद ग्रामपंचायत कडे नाही. तरीदेखील ग्रामसेवक सही व शिक्क्यासह बनावट दाखला २२ जानेवारी २०२५ रोजी तयार करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
शिव प्रहार प्रतिष्ठानने आपल्या निवेदनात म्हटले आहे की,
या बनावट दाखल्याची सखोल चौकशी करण्यात यावी,
दोषींवर ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलमानुसार गुन्हा दाखल करावा,
संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी.
याप्रकरणी प्रतिष्ठानने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी तसेच सर्व माध्यम प्रतिनिधींना प्रत पाठवली आहे.
या तक्रारीनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी होत आहे.


