भोंगवली गणात राष्ट्रवादीची ताकद एकवटली; विश्वजित उर्फ धनंजय जगताप यांच्या उमेदवारीला ग्रामस्थांचा निर्णायक पाठिंबा
मंगेश पवार
सारोळे :- भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आलेले न्हावी गावचे युवा नेतृत्व विश्वजित उर्फ धनंजय सूर्यकांत जगताप यांच्या उमेदवारीला न्हावी पंचक्रोशीसह पूर्व भागातील गावांनी सर्वानुमते पाठिंबा देत विकासाची एकजूट दाखवून दिली आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवत “गाव प्रथम” या भूमिकेतून एकाच उमेदवारामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय ग्रामस्थांनी जाहीर केला आहे.
न्हावी येथील यमाई माता मंदिराच्या सभामंडपात झालेल्या बैठकीत तरुण, प्रौढ, शेतकरी, कामगार अशा सर्व स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी विश्वजित उर्फ धनंजय जगताप यांना एकमुखी पाठिंबा दर्शवत शंभर टक्के मतदान व भोंगवली गणात विक्रमी मतदान घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रत्येक घरातून मतदान करण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.
विश्वजित जगताप यांचे चुलते भालचंदभाऊ जगताप (संचालक – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मर्यादित पुणे) हे सामाजिक व सहकार क्षेत्रात सक्रिय असून न्हावी पंचक्रोशी, पूर्व भाग तसेच तालुका पातळीवरील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून परिचित आहेत. शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून मदत, शेती पंपांना वीज, पाणी, रस्ते तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विश्वजित जगताप हे नेहमीच भालचंदभाऊ जगताप यांच्या सोबत सक्रिय भूमिका बजावत आले आहेत. त्यामुळेच परिसरातील नागरिकांमध्ये त्यांची ओळख आणि विश्वास अधिक दृढ झाला आहे.
न्हावी पंचक्रोशी व पूर्व भागातील गावांची ही एकजूट केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून सर्वांगीण विकासासाठी युवा नेतृत्व उभे करण्याची ठाम सुरुवात असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. या एकमतामुळे भोंगवली गणातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली असून येणाऱ्या निवडणुकीत विश्वजित उर्फ धनंजय जगताप यांच्या उमेदवारीकडे संपूर्ण गणाचे लक्ष लागले आहे.


