भोरमध्ये काँग्रेसनी रणशिंग फुंकला; पंचायत समिती–जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ता उलथवण्याचा निर्धार
मंगेश पवार
भोर:- तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने थेट आक्रमक पवित्रा घेत राजकीय रणशिंग फुंकले आहे. काँग्रेसचे भोर तालुकाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी विरोधकांना थेट आव्हान देत, या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढण्याचा निर्धार जाहीर केला आहे.भोर तालुका वर्षानुवर्षे विकासापासून वंचित ठेवला गेला असून, सत्तेत असणाऱ्यांनी केवळ स्वतःचे खिसे भरले, असा थेट आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. शेतकरी, कामगार, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न दुर्लक्षित करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना यावेळी जनता धडा शिकवणार, असा इशाराही काँग्रेसने दिला आहे.
या निवडणुकीत लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारे, स्वच्छ प्रतिमेचे आणि संघर्षशील उमेदवार काँग्रेस मैदानात उतरवत असून, कामथडी- भोंगवली गटातून निर्भीड पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते वैभव सखाराम धाडवे पाटील यांच्या उमेदवारीची पहिली अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ही उमेदवारी म्हणजे काँग्रेसच्या आक्रमक राजकारणाची सुरुवात असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
“ही निवडणूक खुर्चीसाठी नाही, तर भोरच्या स्वाभिमानासाठी आहे,” असे ठाम शब्दांत सांगत सतीश चव्हाण यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकजुटीने मैदानात उतरण्याचे आदेश दिले आहेत. पक्षाच्या प्रत्येक उमेदवारासाठी रस्त्यावर उतरून प्रचार करावा आणि काँग्रेसचा हाताचा पंजा सत्तेच्या केंद्रात पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
आगामी काळात काँग्रेसकडून आणखी धक्कादायक उमेदवारी जाहीर होणार असून, भोर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. ही निवडणूक म्हणजे भोरच्या राजकारणातील सत्ता बदलाची नांदी ठरणार, अशी चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.


