डिजीटल युगात सरपंच संगणकीय साक्षर हवा : माजी सनदी अधिकारी विकास देशमुख.


सातारा, पाटण प्रतिनिधी :शंकर माने

आपल्यापेक्षा विकासात आघाडीवर असलेल्या गावांना भेटी देऊन आपल्या गावाच्या प्रगतीचा लोकसहभागातून विकासात्मक नियोजन केले पाहिजे. ग्रामपंचायत कामकाज सध्या ऑनलाईन झाल्याने यापुढे गतिमान, पारदर्शक, निधीचा योग्य विनियोग, वेळेवर कामकाज होईल. सक्षम ग्रामविकास करण्यासाठी आता सरपंच, सदस्यांना संगणक ज्ञान आवश्यक असून त्यांनी जबाबदारी ओळखून सर्वोत्तम योगदान द्यावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव आणि माजी सनदी अधिकारी विकास देशमुख यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, सातारा पंचायत समिती आणि केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या विद्यमाने जिल्ह्यातील महिला सरपंचांसाठी आयोजीत केलेल्या एक दिवसीय डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. बी. एस. सावंत, रयत सायन्स सेंटरचे संचालक डॉ. सारंग भोला, राज्य पंचायत विभागाचे समन्वयक अमर ढाले, प्राचार्य विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

ADVERTISEMENT

 

अमर ढाले यांनी ग्रामपंचायत कामकाजातील डिजिटल बदल आणि त्याबाबत सरपंचांची असणारी जबाबदारी स्पष्ट केली. त्यानंतर या कार्यशाळेत प्रत्येक सरपंचांना स्वतंत्र संगणकावर बसून त्यांना केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनींच्या सहकार्याने ई ग्राम स्वराज्य मधील प्रत्येक फोल्डर ओपन करून त्यात असणाऱ्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग, आराखडा, ऑडिट नोंदी, ग्रामसभेचे रेकॉर्ड असणारे पंचायत निर्णय, डिजिटल सहीचा वापर कसा करावा, शाश्वत विकासाची ध्येय साध्य करण्यासाठी पंचायत डेव्हलपमेंट इन्डेक्स, खरेदी प्रक्रिया याबाबत वेबसाईटवर ओपन करून त्याची पडताळणी करण्याचे प्रशिक्षण दिले. अशा पध्दतीचे महिला सरपंचांना संगणकावर बसून प्रशिक्षण देणारी राज्यातील पहिली कार्यशाळा असून हाच पंचायत राज प्रशिक्षण केंद्राने सरपंचांना डिजिटल साक्षरतेचा सातारी पॅटर्न सुरू केला असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य विजय जाधव यांनी केले. स्वागत संचालक डॉ. बी. एस. सावंत तर आभार डॉ. सारंग भोला यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!