ग्रामस्थांनी मानले पालकमंत्री शंभुराज देसाईंचे आभार, टँकर आला गावात
प्रतिनिधी पाटण चाफळ : शंकर माने
चाफळ विभागातील डोंगरमाथ्यावर असलेल्या जंगलवाडी येथे सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू असून याठिकाणी पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करावा, अशी मागणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे ग्रामस्थांनी केली होती. याची तात्काळ दखल घेत या गावासाठी तातडीने टँकरने पाणी पुरवठा करण्याचा आदेश संबंधितांना दिल्याने पाण्याचा टँकर सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. गावाचा पाणी प्रश्न मार्गी लावल्याने जंगलवाडीकरांनी ना. शंभूराज देसाई यांना धन्यवाद दिले आहेत.
डोंगरमाथ्यावर वसलेल्या जंगलवाडी येथे प्रतिवर्षी उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असते. त्यामुळे महिला ग्रामस्थांना पिण्याचे पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. महिलांना आठवड्यातून एकदा डोंगरातून चढउतार करीत गमेवाडी येथील उत्तरमांड धरणावर कपडे धुण्यासाठी यावे लागत आहे. जंगलवाडी गाव निम्मे पाटण व निम्मे कराड तालुक्यात येत असल्याने या ठिकाणी नेतेमंडळींना निधी देताना अडचणी निर्माण होत असतात. तरीही ना. शंभूराज देसाई यांनी दोन्ही तालुक्यातील लोकांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न करुन पाण्याचा टँकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या. टँकर तात्काळ सुरू झाल्याने महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबली आहे.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी जंगलवाडी येथील ग्रामस्थांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे यांनी राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे जंगलवाडीचा पाणी प्रश्न मांडला होता. या गावाला सद्यस्थितीत टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. याचीच दखल घेत ना. शंभूराज देसाई यांनी संबंधितांना तातडीने सूचना दिल्याने जंगलवाडी गावाला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु करण्यात आला. गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर पाठवून दिल्याने गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने ग्रामस्थांनी ना. देसाई यांना धन्यवाद दिले आहेत.


