काँग्रेसमुळेच देश विकासापासून वंचित : खा. उदयनराजे यांचा महायुती मेळाव्यात आरोप.
वाई प्रतिनिधी: देशात गेल्या दहा वर्षापुर्वी सत्ता कोणाची होती. काँग्रेसचीच. काँग्रेसच्या पन्नास वर्षाच्या कार्यकाळात देशाला विकासापासून वंचित ठेवण्याचे काम केले. महाराष्ट्राला आणि पश्चिम महाराष्ट्राकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले, असा आरोप खासदार उदयनराजे यांनी वाई येथील निर्धार मेळाव्यात काँग्रेसवर केला. दरम्यान, वाईच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच गरज आहे, असेही त्यांनी मत व्यक्त केले.
वाई येथे आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यात खासदार उदयनराजे हे बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी आमदार मदन भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, शारदा जाधव, विकासअण्णा शिंदे, प्रदीप माने, रवींद्र भिलारे, सुरभी भोसले, तेजस जमदाडे, अजय मांढरे, रोहिदास पिसाळ, अनुप सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उदयनराजे म्हणाले, आपण येथे निर्धार मेळाव्याला जमलोय, विजयाचा निर्धार करायला जमलोय. आपण नेमके कुठल्या दिशेने जायचे, विकासाच्या दिशेने जात असताना पक्ष कुठला निवडायचा, या पेक्षा तो पक्ष कसा आहे हे पाहिले पाहिजे. स्वातंत्र्य काळापासून काँग्रेसचा काळ बघा, काँग्रेसच्या काळात विकास एवढा झाला नाही. काँग्रेसच्या काळापेक्षा दसपट्टीने विकास कामे प्रत्येक जिह्यात झाली आहेत. या अगोदर का विकास झाला नाही आाणि आता का विकास झाला. त्या काळी लोकांना, समाजातील सुज्ञ नागरिकांना गृहीत पडकले होते. जरी आपण काम केले नाही तरी मतदान कोणाला करणार. इच्छा शक्तीच्या अभावामुळे नाकर्तेपणामुळे काम झाले नव्हते, असा आरोप खासदार उदयनराजे यांनी केला. अलिकडे भाजपाच्या माध्यमातून सर्व मित्र पक्षाच्या माध्यमातून लोकांनी निर्धार केला की जास्त वेगानी आपल्याला भागाला, आपल्या राज्याला, देशाला गतीमान विकासाने पुढे न्यायचे असेल तर सक्षम नेतृत्वाची गरज आहे. ते नेतृत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी पाठपुरावा केला आहे. नमो गंगा प्रमाणे नमो कृष्णा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. वाई शहराच्या डेव्हल्मेंट प्लॅन तयार करायला घेतला आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर येथे तालुका क्रीडा संकुलासाठी प्रयत्न केले जातील, असेही आश्वासित केले.

पालकमंत्र्यांना करावा लागला खुलासा
या निर्धार मेळाव्यात महायुतीतला घटक पक्ष म्हणून आमदार मकरंद पाटील यांच्यासह त्यांच्या गटातले कोणीही उपस्थित नव्हते. त्याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या भाषणात लक्ष वेधून घेत माझं आमदार मकरंद पाटील यांच्याशी फोनवरुन बोलण झाले आहे. अजितदादांशी बोलणं झाले आहे, मीडियांनी त्यांच्या अनुपस्थितीबाबत वेगळा अर्थ काढू नये, असा खुलासा केला.


