अन त्याने केलं कळसूबाई शिखर सर.
सातारा प्रतिनीधी : सह्याद्रीच्या डोंगर रांगा चढताना अवघड वाटते. नित्याचा सराव असणारे, जंगल ट्रेक करणारे सुद्धा नियोजन करून मोहिमेवर जात असतात. मात्र, महाराष्ट्रातले सर्वात उंच असलेल्या कळसुबाई शिखरावर जायचा निर्धार करत तेथे रणरणत्या उन्हात पाऊल ठेवणारा कडवे बुद्रुकचा अवलिया राजाराम कदम. चार तासाच्या परिश्रमानंतर कळसुबाई शिखर सर केलंय.
दुर्ग प्रेमी, गडप्रेमी कार्यकर्ते तसेच जंगल ट्रेक करणारे, भटकंती करणारे अगोदर जिथं जायचं त्या भागाचा, त्या परिसराची रेकी करतात, माहिती घेतात, नियोजन करतात मग मोहिम आखतात. कुठं मुक्काम करायला लागेल, कसा मार्ग असेल, प्रवासात अडचण काही नसेल ना, असे बारकावे घेतले जात असतात. पण पाटण तालुक्यातील कडवे बुद्रुक गावचे राजाराम कदम हे नोकरीनिमित्त मुंबईत असतात. त्यांच्या मनात आले कळसुबाई शिखर चढण्याची. एकदा ठरवलं की मग मागे नाही हटायच म्हणत त्यांनी कळसुबाई एकटयाने मोहीम आखली. अन रविवारी कळसुबाई शिखर चढण्यास सकाळी सुरुवात केली. जसा उन्हाचा पारा वाढू लागला तस लोखंडी पायऱ्या भाजू लागल्या. अर्धे अंतर पार केल्यावर पाय थरथरु लागले. पुढे जावे की मागे यावे असे राजाराम यांना वाटू लागले पण मनी निर्धार केल्याने राजाराम यांनी हाताने अर्ध्या राहिलेल्या शिड्याच्या पायऱ्या पूर्ण केल्या. शिखरावर पोहचल्यावर उन्हात सुद्धा गार वाहणारा वारा हा शिखर सर केल्याचा आनंदाने सगळा थकवा निघून गेला. राजाराम कदम यांनी कळसुबाई सर केल्याबद्दल कडवे परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


