बावधनच्या एकास पुण्यातल्या महिलेने 13 लाखाला फसवले ; वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अद्याप महिलेस अटक नाही .
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
वाई तालुक्यातील बावधन गावचे प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व म्हणून असलेले वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी बरमाराम कचरे (वय 39) यांना पुण्यातील महिलेने विश्वास संपादन करुन 13 लाख 93 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा वाई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्या महिलेस अद्यापही वाई पोलिसांनी अटक केली नाही. या दाखल झालेल्या गुह्यामुळे वाईसह बावधन परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तानाजी कचरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 5 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता संबधित महिला ही वाई न्यायालयाच्या बाहेर भेटली. त्यावेळी त्या महिलेशी बोलत असताना त्या महिलेने तानाजी कचरे यांना सांगितले की त्यांचा सिद्धनाथवाडी येथील प्लॉटवर वाई येथील दिवाणी न्यायालयात विठ्ठल मल्हारी गायकवाड यांच्यासोबत माझा वाद सुरु आहे. त्या दाव्याकरता आर्थिकदृष्टया कमजोर आहे. तरी तुम्ही मला आर्थिक मदत करावी. सिद्धनाथवाडी येथील माझा प्लॉट तुम्हाला विकेन, तसेच तुमच्याकडून घेतलेले पैसेही परत देईन, असा विश्वास तीने संपादन केला. त्यानुसार दि. 10 एप्रिल 2023 रोजी वाई मार्केट कमिटी येथील तानाजी कचरे यांच्या शिवम मेन्स वेअर या दुकानात त्या महिलेला महेंद्र मारुती शिंदे यांच्यासमोर 1 लाख रुपये दिले. त्यानंतर दि. 11 मे 2023 रोजी पासून मदत लागेल असे गुगल पे, फोन पे वरुन 83 हजार 400 रुपये दिले. त्यानंतर वाई न्यायालयात दाव्याची तडजोड झाली. त्यानंतर पुन्हा दि. 20 जुन 2023 रोजी त्या महिलेने तानाजी कचरे यास सांगितले की माझे पुणे येथे चौधरी यांच्यासोबत पुणे न्यायालयात फौजदारी केस सुरु आहे. त्याकरता मला 6 लाख रुपये लागणार आहेत. त्यानंतर तानाजी कचरे यांनी बावधन येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून त्या महिलेच्या खात्यात 6 लाख रुपये आरटीजीएस केले. त्यानंतर तानाजी कचरे यांनी वेळोवेळी पैसे परत करण्याची विनंती त्या महिलेकडे केली. तेव्हा त्या महिलेने तानाजी कचरे यांना सांगितले की या केसमुळै माझे स्टेट बँक ऑफ इंडियाचे पुण्यातले खाते गोठावले आहे. ते चालू होताच पैसे परत करते. त्यानंतर दि. 1 जुलै 2023 रोजी 90 हजार व दि. 4 जुलै 2023 रोजी 50 हजार अशी एकूण 1 लाख 40 हजार रुपये गाडीचा हप्ता, मुलाची शाळेच फी, ती महिला आजारी असल्याचे सांगून तिच्या उपचारासाठी रक्कम आरटीजीएसद्वारे दिली. त्यानंतर त्या महिलेने तानाजी कचरे यांना दि. 6 सप्टेंबर 2023 रोजी पैशाची मागणी केली असता मनी ट्रान्सफरने 70 हजार रुपये पाठवले. असे 9 लाख 93 हजार 400 रुपये दिले. ते पैसे मागितले असता त्या महिलेने तानाजी कचरे यांना पुणे येथील दोन प्लॅटची विक्री झाल्यावर तुम्हाला पैसे देईन अशी वारंवार सांगत होती. त्यानंतर त्या महिलेने फोनवरुन तानाजी कचरे यांना फोनवरुन उंड्री पुणे येथील सदनिका लो रॉयल्स व श्रीदेवी कन्ट्रक्शन ग्रुप या कंपनीचे भाटीया व बंद्रानी व नामबिआर यांच्या साईटमध्ये एक प्लॅट असून तो नावावर करण्याकरता स्टँम्प डयुटीपोटी 4 लाख रुपये लागणार आहेत. ती रक्कम दिल्यास माझ्या नावावर प्लॅट झाल्यावर तो विक्री करुन तुमची सर्व रक्कम परत करेन, असे तीने सांगून तानाजी कचरे यांच्याकडून पैसे घेतले. त्यानंतर ती महिला वेळोवेळी अडचणी सांगू लागली आणि आणखी तानाजी कचरे यांच्याकडे 11 लाख रुपयांची मागणी करु लागली. त्यावर 11 लाख रुपये आरटीजीएस ट्रान्सफर केले. तिच्या प्लॉटचे रितसर खरेदीखत केले. दि. 3 नोव्हेंबर 2023 राज त्या महिलेला शिवम मेन्स वेअर येथे येवून चंद्रकांत महांगडे, अस्लम शेख, महेंद्र शिंदे याच्ंया समोर 4 लाख दिले. पैशांची मागणी केली असता परत दिले नाहीत. फसवणूक केली असून त्या महिलेच्या विरोधात वाई पोलीस ठाण्यात तानाजी कचरे यांनी गुन्हा दाखल केला आहे.


