पुणे येथील सात जण भुशी डॅमला गेले वाहून.
हडपसरच्या सय्यदनगर येथील एकाच कुटुंबातील सात जण भुशी धरण परिसरातील धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. दोघांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडता आल्याने ते बचावले. मात्र, चार लहान मुलांसह एक महिला वाहून गेली. त्यापैकी तिघांचे मृतदेह बचाव पथकाने शोधले, तर दोघे बेपत्ता होते.
नूर शाहिस्ता अन्सारी (वय ३५), अमिना अदिल अन्सारी (वय १३), मारिया अन्सारी (वय ७), हुमेदा अन्सारी (वय ६) आणि अदनान अन्सारी (वय ४, सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) अशी भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्यांची नावे आहेत. लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यदनगर येथील अन्सारी परिसरातील १५ ते १६ जण रविवारच्या सुटीचे औचित्य साधून लोणावळ्यात वर्षाविहारासाठी सकाळी आले होते. ते सर्व जण १२ वाजेदरम्यान लोणावळ्यातील भुशी धरणाच्या मागील बाजूच्या धबधब्याकडे गेले होते. त्यावेळी पडणाऱ्या पावसाचा अंदाज न आल्याने पाणी एकत्र आल्याने सर्वजण धबधब्यामध्ये अडकले होते.काठावरील नागरिक व्हिडिओ चित्रीकरण करत होते. पाण्याचा प्रवास जास्त असल्याने नागरिकांना मदत करता येत नव्हती, तरीही काठावरील नागरिक झाडाच्या फांद्या अन्सारी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु नागरिकांच्या प्रयत्नांना यश आले नाही. तिघांचे मृतदेह हाती लागले असून दोघे बेपत्ता आहेत.


