माऊलींच्या पालखीमध्ये वाहने न सोडल्याने पालखी विश्वस्त आणि पोलीस प्रशासनामध्ये खडाजंगी.
फलटण: दिलीप वाघमारे
फलटण : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटणचा मुक्काम आटपून भल्या पहाटे बरड कडे पुढील मुक्कामासाठी निघाली असता फलटण शहराच्या मुख्य क्रांतिसिंह नाना पाटील चौकात पालखी सोहळ्यातील वाहने पुढे न सोडल्यामुळे पालखी सोहळा विश्वस्त व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. फलटण पोलिसांचा ढिसाळ कारभारामुळे हा प्रश्न उद्भवला असल्याचे बोलले जात आहे.पालखी सोहळ्यातील दिंड्यांची वाहने क्रमपात्र पुढे सोडण्याचा प्रघात असून ही वाहने पुढे जाऊन दिंडीतील वारकऱ्यांना नाष्टा जेवणाची सोय करत असतात परंतु ही वाहने पालखी सोहळ्याच्या मागे राहिल्याने हा वाद निर्माण झाला.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी चौकातच माऊली सोहळा थांबून अप्पर पोलीस अधीक्षक सातारा आचल दलाल व फलटण शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांना जाब विचारत अनेक प्रश्नांचा भडीमार विश्वस्तांनी त्यांच्यावर केला या संदर्भात पोलीस प्रशासनाला समाधानकारक उत्तर देता आली नसल्यामुळे हा वाद पुढे विकोपाला गेल्याचे दिसले.दरम्यान स्वतःपालखी सोहळा विश्वस्त,चोपदार आणि प्रमुख दिंडीप्रमुखांनी क्रांतिसिंह नाना पाटील चौकातील झालेली ट्राफिक मोकळी करून माऊलींची पालखी पुढे मार्गस्थ केली.या सर्व प्रकारामुळे फलटण शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.


