गणेशोत्सवात विकास हरवला, नेत्यांचा मेळा वाढला!पण रस्ते-पाणी-रोजगाराचे प्रश्न कायमच!
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
दि. 6 सारोळे( भोर) :-गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्रात उत्साह, जल्लोष आणि सामाजिक ऐक्याचं प्रतिक. गावोगावी सजलेले मंडप, गजरात होणाऱ्या आरत्या आणि युवकांचा उसळता उत्साह या सर्वामुळे सणाची खरी शोभा वाढते. मात्र यंदाच्या गणेशोत्सवात केवळ भक्तिभाव नाही, तर राजकीय रंग ठळकपणे दिसून येतोय.
. आरत्यांपेक्षा पुढाऱ्यांची गर्दी
गावात क्वचित पाऊल ठेवणारे अनेक राजकीय पुढारी मंडळांच्या आरत्या, मिरवणुका आणि कार्यक्रमांना गर्दी करताना दिसत आहेत. आरतीच्या नावाखाली देणगी, तर प्रसादाच्या निमित्ताने उदार देणग्या – यामुळे मंडळांची चांदी झाली असली तरी खरी जनतेची कामे मात्र बाजूला पडली आहेत.
गावोगावी प्रश्न मात्र तेच
गावोगावी रस्त्यांची दुरवस्था, पाणीटंचाई, वीजपुरवठ्याच्या समस्या, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न – या सगळ्या अडचणी पूर्वीसारख्याच आहेत. पण उत्सवाच्या काळात या प्रश्नांवर चर्चा न होता पुढाऱ्यांच्या प्रसिद्धीचा उत्सव रंगतोय, अशी जनतेत भावना व्यक्त होत आहे.
तरुणाईतून नाराजी
तरुण वर्गात यंदा वेगळाच सूर ऐकायला मिळतोय. “पुढारी एकदा निवडून आले की पाच वर्षं दिसत नाहीत. निवडणुका थोड्या लांबल्या तर गावकुसातल्या मंडळांना अजून फायदा होईल,” अशी उघड चर्चा चौकाचौकात सुरू आहे. विशेष म्हणजे आता नवरात्र उत्सव जवळ येत असल्याने राजकीय संचार फेरी आणखी वाढणार हे निश्चित मानलं जात आहे.
पूर्व भागातून उमेदवार हवा!
यंदा मात्र निवडणुकीतून वेगळा ट्रेंड डोकावत आहे. “उमेदवार हवा तर पूर्व भागातून हवा, आम्ही सारखेच तुम्हालांच का निवडून द्यायचं?” असा रोखठोक प्रश्न युवक विचारत आहेत. या मतामुळे स्थानिक राजकारणात नवा वळण लागण्याची चिन्हे आहेत.
पक्षांची मोर्चेबांधणी
सध्या इच्छुकांची रांग मोठी आहे. मात्र अंतिम तिकीट कुणाला मिळणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस – हे चारही पक्ष आपापल्या ताकदीने मोर्चेबांधणी करत असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोण बाजी मारतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जनतेचे खरे प्रश्न कोण सोडवणार?
गणेशोत्सवात बाप्पांच्या दर्शनासोबत राजकीय नेत्यांचीच झलक जास्त ठळकपणे दिसते आहे. आरत्या, प्रसाद आणि देणग्यांमध्ये नेत्यांची प्रसिद्धी वाढते आहे. पण सरळ प्रश्न जनतेच्या मनात उभा राहिला आहे – रस्ते अजूनही खड्ड्यांनी भरलेले पाणीपुरवठ्याचा प्रश्न अद्याप कायम,वीजपुरवठ्यातील अडचणी सुटलेल्या नाहीत,तरुणांच्या रोजगाराच्या संधी मर्यादित गावोगावच्या विकासकामांना गती नाही“सण साजरा करण्यापेक्षा नेत्यांची प्रसिद्धीच जास्त दिसत आहे. मग खरे प्रश्न कोण सोडवणार?”
हर्षद बोबडेसर, सामाजिक कार्यकर्ते, राजापूर


