भोर आगाराला नव्या एसटी बसेसचा मोठा लाभ – ग्रामीण भागात प्रवास होणार सुलभ! मा.आ.संग्राम थोपटे यांचा पाठपुरावा
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
दि. 5 भोर :-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभागाकडे भोर आगारासाठी करण्यात आलेल्या 20 वाहनांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. याअंतर्गत भोर आगाराला टप्प्याटप्प्याने नवीन बसेस मिळणार असून, पहिल्या टप्प्यातील 5 लांब पल्ल्याच्या एसटी बस आगारात दाखल झाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील आणखी 5 बसेस लवकरच दाखल होणार असल्याची माहिती माजी आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
भोर आगारात अनेक बसेस नादुरुस्त असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. प्रवासात वारंवार अडथळे निर्माण होत असल्याने शेतकरी, विद्यार्थी व सामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर नवीन बसगाड्यांची मागणी करण्यात आली होती. शासनाने या मागणीला मान्यता देताच भोर आगारासाठी अतिरिक्त बसेसचा पुरवठा सुरु झाला आहे.
पुढील काळात ग्रामीण व डोंगरी भागात एसटीच्या फेऱ्या नियमित होतील.
विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचण्यास मदत मिळेल.
दुर्गम भागातील लोकांना प्रवासाचा मोठा दिलासा मिळणार आहे.
मा.आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, “वाहनांच्या उपलब्धतेसाठी राज्याचे मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यामुळे भोर मधील ग्रामीण व डोंगरी भागातील जनतेस मोठा दिलासा मिळणार आहे.”


