किकवी विद्यालयात उत्साहात शिक्षक दिन साजरा
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क.
सारोळे (ता.भोर ) – किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी येथे भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस “शिक्षक दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक उत्तमराव अहिरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापिका ज्योती हजारे, सामाजिक कार्यकर्ते व कबड्डी असोसिएशन सदस्य संभाजीराव पाटणे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवर पाहुण्यांचा सत्कार मुख्याध्यापक विनोद राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान केला.
सकाळच्या सत्रात “विद्यार्थी-शिक्षक दिन” उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेतून अध्यापन व शालेय कामकाजाचा अनुभव घेतला.
कार्यक्रमादरम्यान इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. शिक्षकांच्या वतीने मगर सर, सुतार मॅडम व बोबडे सर यांनी विचार मांडले.
कार्यक्रमाचे नियोजन मगर सर व सुतार मॅडम यांनी केले. यावेळी पाहुण्यांनी विद्यालयातील उपक्रमांचे कौतुक केले. माजी मुख्याध्यापिका ज्योती हजारे यांनी विद्यालयास सतरंजी खरेदीसाठी ५,००० रुपये देणगी दिली.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसह मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
किकवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय भिलारे यांनी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे शैक्षणिक कार्याबद्दल कौतुक केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अशा उत्साही वातावरणात शिक्षक दिन साजरा झाला.


