कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; कोयना धरणात झाला 52.15 TMC इतका पाणीसाठा
पाटण प्रतिनिधी : शंकर माने
कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात पाऊस सुरु असून कोयनेच्या जल साठ्यात देखील चांगली वाढ झाली आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 52.15 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 49.55 टक्के भरले आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत असून शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना येथे 56 तर नवजाला 64 आणि महाबळेश्वरमध्ये 64 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या पावसामुळे कृष्णा आणि कोयना नदीतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच मुसळधार पावसामुळे कोयना धरणात पाणीसाठ्याने पन्नास टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 2 हजार 342 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 2 हजार 784 आणि महाबळेश्वरमध्ये 2 हजार 168 मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात आवक वाढली असून शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारापर्यंत 40 हजार 462 क्यूसेक वेगाने पाणी येत होते.


