राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या धर्मदाय निधीमधून ५०००० रुपयांचे न्हावीगावा मध्ये शालेय साहित्य वाटप.
पुण्यभूमी न्यूज नेटवर्क
सारोळे : राज्याचे नेते तसेच उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवार दि. २३ रोजी न्हावीगाव आणि पंचक्रोशीमध्ये प्राथमिक शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान असणारे तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांचे प्राथमिक शिक्षण ज्या शाळेमध्ये झाले त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा न्हावी येथे खाऊवाटप आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधेसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धर्मदाय निधीतून बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या प्रयत्नाने (५०,०००/- रूपये) खरेदी केलेले साहित्य वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यात प्रिंटर, पोर्टेबल चार्जिंग साऊंड सिस्टिम, शालेय साहित्य आणि विविध उपक्रम उपयुक्त साहित्य अशा विविध वस्तूंचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी भालचंद्र जगताप यांच्या समवेत भोर तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शाळेचे मुख्याध्यापक संदीप मोरे,अनिल चाचर, रूपाली पिसाळ आणि त्यांचे सर्व शिक्षक सहकारी त्याचबरोबर ग्रामस्थ, पालक, महिला, युवक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी भालचंद्र जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना माननीय अजितदादा शैक्षणिक क्षेत्रासाठी लागणाऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी कधीच तडजोड करत नाहीत. अजितदादा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष झाल्यानंतर जिल्ह्यातील शिक्षण संस्थेच्या सर्व जुन्या इमारतींचे नूतनीकरण करून त्या ठिकाणी सर्व सोई सुविधायुक्त आधुनिक शाळेमध्ये रूपांतर केले. विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट शैक्षणिक सुविधा मिळावी तसेच राज्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर सुधारावा म्हणून ते नेहमी प्रयत्नशील असतात हे सांगताना त्यांच्या शालेय जीवनातील काही आठवणींनाही उजाळा दिला, तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांशी हितगुज करताना त्यांचे बालपण आठवले असे सांगितले. त्यांनी शाळेच्या होत असलेल्या भौतिक व गुणवत्तापूर्ण प्रगतीबद्दल आणि नेहमी नवनवीन उपक्रम घेणारे अनिल चाचर आणि शिक्षकांचे व मुलांचे कौतुकही केले. आणि भविष्यात सुद्धा शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप मोरे, सूत्रसंचालन अनिल चाचर आणि आभार रूपाली पिसाळ यांनी मांडले.


