भोर बांधकाम विभागाचे संथ गतीने सुरू असलेल्या कामासंदर्भात भोंगवली ग्रामस्थांकडून निवेदन जारी.
कार्यकारी संपादक: सागर खुडे
पहिल्याच पावसात भोर तालुक्यांतील बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागांतील रस्त्यांची चाळण झाली आहे. मुख्यत्वे खडीकरण, डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण अशा तीन प्रकारांत रस्त्यांची कामे केली जातात.अपवाद वगळता दरवर्षी कमीत कमी ३५ते४०लक्ष इतका खर्च रस्त्यांवर केला जातो. मात्र, तरीही बहुतांश रस्ते सध्या ‘मरणयातना’ सोसत आहेत.काहींना काँक्रिटीकरणाचं भाग्य लाभले आहे. पण, ते रस्तेही घसरडे झाल्याने अपघातांना कारणीभूत ठरताहेत. मागिल काही महिन्यापूर्वीच या भोंगवली ते माहूर खिंड या रस्त्याच्या गुणवत्तेप्रश्नी बोटे दाखवण्यात आली होती.आणि दैनिकांमध्ये देखील या बाबत बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु गेंड्याच्या कातडीचे प्रशासकीय आधिकारी बड्यांच्या ताटाखालचे मांजर झाल्यामुळे त्या संबंधित ठेकेदार आणि आधिकारी यांच्यातील ठरलेली टक्केवारी कमी जास्तं झाल्यामुळे तर अशा पद्धतीत निकृष्ट दर्जाची रस्त्यांची कामे होतात की काय?असा प्रश्न भेडसावतो आणि यात तिळमात्र शंका नाही.मागिल काही महिन्यांपूर्वीच याच स्त्याच्या दुरुस्तीबाबत पावसाळा सुरू होण्यापूर्वी न्हावी येथील काही भागातील तरुणांनी पुढाकार घेऊन संबंधित ठेकेदार काळ्या यादीत टाकुन झालेली चाळण मलमपट्टी न करता दुरुस्त करून देण्यासाठी आंदोलन पुकारले होते.आणि त्या मागणीपर रस्त्यांचे डांबरीकरण केले खरे; मात्र त्यातील काही रस्त्यांची अवस्था आज दयनीय झाली आहे. विशेषतः भोंगवली ते माहूर खिंड या भागातून रात्री अपरात्री तरूण आणि नागरिक मोठया प्रमाणात अर्थार्जनहेतू कामासाठी या रस्त्याने ये जा करतात.भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. त्यामुळं काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत.पोत घसरला असून काहीवेळा अपघात देखील होण्याच्या घटना वारंवार घडतात.मुळात हे रस्ते खराब का झाले??? याची कारणमीमांसा करण्यापेक्षा पावसाळ्यात डांबरीकरणाची कामे करता येत नाहीत, एवढेच कारण देण्यात बांधकाम विभाग भोर येथील प्रशासन आधिकारी आपली धन्यता समजतात हे पाहावयास मिळाले असून,प्रशासनाने आता खड्डे बुजवून नुसती मलमपट्टी करण्यापेक्षा एकदा डांबरात रुतलेल्या खुर्चीवरून खाली उतरून बघावं.मग कळेल की ठेका दिलेले ठेकेदार अर्थात कंत्राटदार अतिशय थातूरमातूर पद्धतीने कामं करतात आणि आपलीं पोळी भाजून मोकळे होतात.या कटूसत्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तज्ज्ञांच्या मते रस्त्यावरच्या प्रत्येक खड्ड्याचा अंदाज घेऊनच ते दुरुस्त करायला हवे.खड्डे बुजवण्यापूर्वी त्यात डांबर टाकतानाच लहान-मोठे दगड टाकून पुन्हा डांबराचा थर टाकणे आवश्यक असते. मात्र, अपवाद या खड्ड्यांत फक्त डांबरमिश्रित खडी टाकत प्रशासन आणि संबंधित ठेकेदार आपली जबाबदारी टाळत आहे. यामुळं खड्ड्यांत दगड-विटा मिक्स करत चुनखडीचा वापर करण्याच्या तंत्रावरही शंका घेतली जाते. हे तंत्र योग्य असले, तरी प्रत्येक खड्ड्यासाठी ते लागू पडेलच असे नाही. मात्र, केवळ उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने रस्त्यांची कामे उरकली गेल्यामुळे पावसाळ्याच्या प्रारंभीच या कामांचे पितळ उघडे पडले.जाणीव पुर्वक केली जातात निकृष्ट दर्जाची कामे?बांधकाम विभाग दरवर्षी रस्ते बांधतो. अर्थात या रस्त्यांचे बांधकाम नेहमीप्रमाणे निकृष्ट दर्जाचेच असते. या विभागात काम करणाऱ्या अभियंत्यांना कशाप्रकारे बांधकाम केल्यावर रस्ता किती वर्षे टिकू शकतो हे ज्ञान निश्चितच असते, पावसाचा रस्त्यांवर कितपत परिणाम होऊ शकतो? याचीही सर्व माहिती अभियंत्यांना असते. मात्र, रस्ते बांधणारे ठेकेदार(कंत्राटमालक)अशाचप्रकारे रस्ता बांधतात की, तो पुन्हा एका पावसात दुरुस्तीला आला पाहिजे. म्हणजे, पुन्हा त्याच रस्त्यातून नवी गंगाजळी उभी राहावी. शिवाय कंत्राट देताना होणारा भ्रष्टाचार हा वेगळाच ! वास्तविक, खडीकरण केलेल्या रस्त्यांचे आयुर्मान तीन वर्षांचे असते. त्यानंतर किमान सहा महिन्यांनी त्याच्या देखभाल दुरुस्तीवर खर्च करण्याची गरज पडते. प्रत्यक्षात मात्र शहरात खडीकरण केलेले रस्ते दरवर्षीच उखडतात.विशेष म्हणजे, उखडलेल्या रस्त्यांचा खर्च संबंधितांनी करणे गरजेचा असताना तो बांधकाम विभाग यांच्याच माथी मारला जातो. या गोष्टीला प्रशासन नकार देत असेल तर, दरवर्षी खड्डे बुजवण्यासाठी स्वतंत्र खर्च मंजूर केला जातो, त्याचे प्रयोजन काय???? संबंधित ठेकेदार देखभाल दुरुस्तीचा खर्च करणार असेल, तर बांधकाम विभागाने नव्याने खर्च करण्याची गरजच काय? हे देखील अनोत्तरीत अद्यापही?
त्याचप्रमाणं भोंगवली येथील संथ गतीने सुरू असलेल रखडलेल तालीमीचे काम याचा खुलासा द्यावा
याच प्रश्र्नी आज दि.२३जुलै२०२४भोंगवली ग्रामस्थांकडून बांधकाम विभाग भोर यांना या रस्त्यांच्या दुरुस्तीकामी निवेदन देण्यात आले. येणाऱ्या काळात सदरचा रस्ता तात्काळ दुरुस्त न झाल्यास भोंगवली ग्रामस्थ यांचेतर्फे उपविभागीय अधिकारी बांधकाम विभाग भोर यांचें कार्यालयासमोर येत्या दोन दिवसांत आंदोलन करण्याचां इशारा देण्यात आला आहे.
सदरचे निवेदन बांधकाम विभागाचे अधिकारी कांबळे यांना देण्यांप्रसंगी शिवप्रहार संघटना भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहिते, सरपंच अरुण पवार, भाजप शाखाध्यक्ष वसंत परभळ, यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


