खंडाळा तालुक्यातील सुखेड आणि बोरीचा बार येथे पोलीस बंदोबस्तात जोरदार शिव्यांच्या भडिमारात रंगला कार्यक्रम.


उपसंपादक : दिलीप वाघमारे

संपूर्ण महाराष्ट्रात शिव्याशाप देण्याची अनोखी परंपरा असलेला बोरीचा बार यंदाही परंपरागत पद्धतीने शनिवारी दुपारी सव्वा बारा ते एक वाजेपर्यंत असा पाऊण तास खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी येथील वाहणाऱ्या ओढ्यात पार पडला . दोन्ही गावांतील महिलांनी सनई हलगीच्या तालावर वाजत गाजत ओढ्यावर एकत्र येऊन एकमेकींवर शिव्यांचा भडिमार करत अनोखी परंपरा कायम ठेवली .

 

 

नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी पार पडणारा सुखेड व बोरी गावातील बोरीचा बार संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. या दिवशी दोन्ही गावांतील महिला एकत्र येऊन एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहतात. गावातील ओढ्यावर जमून दोन्ही बाजूकडील महिलांकडून एकमेकांना हातवारे करीत शिव्या दिल्या जातात.

ADVERTISEMENT

बोरीचा बार सुरू होताना दोन्ही गावातील महिला एकत्र येऊन ओढ्यावर शिव्यांची लाखोली वाहत असतात, त्यावेळी पुरुष मंडळी ओढ्याच्या मध्यभागी उभे राहून दोन्ही महिलांना एकमेकींपासून लांब ओढण्याचा प्रयत्न करत होते .  बोरीचा बार साजरा होताना हलगी व सनईच्या सुरात महिलांना अधिकच चेव चढत होता. बार सुरू होण्यापूर्वी दोन्ही गावातील महिला ग्रामदैवताच्या मंदिरासमोर एकत्र आल्या. तेथून या महिला झिम्मा, फुगडी, फेर धरत ओढ्यापर्यंत आल्या ओढ्यात पाणी असल्याने त्यांनी ओढ्याच्या काठावर उभे राहून पैलतीरावर असलेल्या महिलांवर शिव्यांचा भडीमार करीत बोरीचा बार साजरा केला. जस जसे डफडे वाजेल असा बोरीचा बार साजरा करताना महिलांचा आनंद द्विगुणित होत होता खंडाळा तालुका व आजूबाजूच्या हजारो नागरीकांनी हा उत्सव पाहण्यासाठी चांगलीच गर्दी केली, महिलांना आवरण्यासाठी पोलीसांना मोठी कसरत करावी लागत होती. महिलांना आवरता आवरता पोलिसांची चांगलीच दमछाक झाली बोरी गावात मिठाईची दुकाने लागली लहान मुलांचे पाळणे गावात आले होते.बोरी गावाला यात्रेचे स्वरूप आले होते मिठाई , तरुणाई मोबाईलमध्ये फोटो शुटींग काढण्यात चांगलीच दंग होती या वेळी लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांनी शांतता व सुव्यवस्थेसाठी महिला पोलिसांसह मोठा फौजफाटा तैनात केला होता.

या बोरीच्या बार संदर्भात एक दंतकथा आहे. एक पाटील होते. त्यांना दोन बायका होत्या. पैकी एक सुखेड तर दुसरी बोरी या गावातील होत्या. त्या दररोज दोन्ही गावाची शिव असणाऱ्या ओढ्यावर धुणे धुण्यासाठी येत होत्या. ओढ्यावर दोघी एकत्र आल्यावर त्यांच्यात वाद होऊन दोघी एकमेकींना हातवारे करत शिव्या द्यायच्या. यावरून या बोरीचा बार अशी प्रथा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. केवळ जिल्ह्यातूच नव्हे; तर इतर जिल्ह्यांतूनही हा बोरीचा बार पाहण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी होते .

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!