सोपानकाका पालखी सोहळ्यात बीव्हीजीची आरोग्यसेवा उजळली; हजारो वारकऱ्यांना वैद्यकीय मदत, भोरचे डॉ. मंदार माळी व टीमचे स्तुत्य कार्य”
संपादक मंगेश पवार
कार्यकारी संपादक सागर खुडे
दि. 29 भोर – संत सोपानकाका पालखी सोहळा २०२५ दरम्यान बीव्हीजी (BVG India Ltd.) संस्थेच्या वतीने सलग ११व्या वर्षी आरोग्यसेवा पुरवण्यात आली. सासवड ते पंढरपूर मार्गावरील पालखी सोहळ्यात सहभागी होत असलेल्या वारकऱ्यांना वेळोवेळी वैद्यकीय मदत पुरवण्यात आली. यामध्ये आपत्कालीन सेवा तसेच ओपीडीद्वारे प्राथमिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
बीव्हीजीच्या या उपक्रमाद्वारे सासवड ते बारामती दरम्यान तब्बल १७ आपत्कालीन रुग्णांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली. यामध्ये रक्तदाब, श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे, व्रण, डिहायड्रेशन अशा तातडीच्या प्रकृती असलेल्या रुग्णांचा समावेश होता.
तसेच ओपीडीद्वारे सुमारे १००० ते १५०० वारकऱ्यांना सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पायदुखी अशा आजारांवर उपचार देण्यात आले. वारकऱ्यांची थकवा, उन्हामुळे होणारे त्रास आणि पावसामुळे होणारे संसर्गजन्य आजार लक्षात घेता बीव्हीजीच्या वैद्यकीय पथकाने वेळेवर सेवा दिली.
या उपक्रमात बीव्हीजी पायलट दामोदर अहिरे, डीएम डॉ. प्रियांक जावळे, एडीएम सुजित पाटील, संतोष येनपुरे, संतोष कोळपे आणि केतन कोळपे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्यामुळेच हा आरोग्य उपक्रम यशस्वीपणे राबवता आला.
वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या बीव्हीजीच्या या कार्याची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे. समाजसेवेचा वसा घेतलेली ही टीम वारकऱ्यांना श्रद्धेच्या प्रवासात आधार देणारे खरे वैद्यकीय रक्षक ठरले आहेत.
या आरोग्यसेवेबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर प्रहार उपाध्यक्ष अजय कांबळे यांनी समाधान व्यक्त करत सांगितले,
“संत सोपानकाका पालखी सोहळ्यात बीव्हीजी आरोग्य पथकाचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. विशेषतः डॉ. मंदार माळी यांनी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी जे योगदान दिले, ते मनापासून प्रेरणादायक आहे. त्यांनी दिलेल्या तत्पर व संवेदनशील सेवेने अनेकांना दिलासा मिळाला. अशा वैद्यकीय सेवकांमुळेच पालखी सोहळा सुखरूप आणि आरोग्यपूर्ण ठरत आहे.”
अजय कांबळे प्रहार उपाध्यक्ष भोर तालुका


