राजगड तालुक्यात पर्यटनावर बंदी; नियमांचं उल्लंघन सुरूच.
संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक सागर खुडे
दि.29 नसरापूर :- राजगड तालुक्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर सुरू आहे. संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा धोका लक्षात घेता प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी २२ जून २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत राजगड, तोरणा, मढे घाट, गुंजवणी, पानशेत आणि वरसगाव या पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी लागू केली आहे. ही बंदी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि नागरी सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत लागू करण्यात आली आहे.
महत्त्वाचे नियम काय?
धबधब्यात उतरणे, पोहणे, सेल्फी/चित्रिकरण पूर्णतः बंदी,मद्यपान, मद्य बाळगणे किंवा उघड्यावर सेवन करण्यास सक्त मनाई
प्लास्टिक, थर्माकोलचा वापर आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे निषिद्ध
धोकादायक ठिकाणी वाहन थांबवणे किंवा गर्दी करणे टाळावे
नियम असूनही अंमलबजावणीत ढिलाई
मढे घाट परिसरात काही पर्यटकांनी नियम झुगारून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, काहींनी वनविभागाने लावलेली सुरक्षा दोरी तोडून खाली उतरायचा प्रयत्न केला. वनपाल मंजुषा घुगे यांनी पोलिसांच्या मदतीने संबंधितांना समज देत परत पाठवल्याची माहिती दिली.
या बंदीबाबत प्रशासन आणि पोलिसांकडून परस्परविरोधी विधाने ऐकायला मिळत आहेत.
प्रांताधिकारी डॉ. खरात यांनी स्पष्ट सांगितले की,
> “बंदी आदेश मागे घेतलेले नाहीत. बंदी कायम आहे. नागरिकांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा.”
दुसरीकडे वेल्हा पोलीस स्टेशनचे पीआय नितीन खामगळ यांनी सांगितले की,
“पर्यटनावर बंदी नाही, फक्त अॅडव्हेंचर ॲक्टिव्हिटींवर बंदी आहे. नव्या आदेशाची खात्री करून सांगतो.”


