भोर तालुक्यात पंचायत समिती–जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोड
सारोळे :-भोर तालुक्यातील राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे — प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष अजय कांबळे हे लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार असून, आगामी काळात ठोस राजकीय भूमिका घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नुकतीच झालेली एक गुप्त बैठक सध्या राजकीय गोटात चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे.
पूर्व भागातील अभ्यासू, बेधडक आणि स्पष्टवक्ते तरुण म्हणून ओळखले जाणारे अजय कांबळे हे नाव कोणालाही अनोळखी नाही. रस्त्यावरील आंदोलनांपासून ते सामान्य जनतेच्या प्रश्नांपर्यंत त्यांच्या कार्याची सातत्याने चर्चा होत असते.
‘पूर्व भाग कृती समिती’ ही संकल्पना त्यांनी पुढे आणली होती, जी अनेक सामाजिक आणि विकास विषयांवर प्रभावीपणे कार्यरत आहे.
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) चे नेते कुलदीप तात्या कोंडे यांनी देखील अजय कांबळे यांची भेट घेऊन त्यांना पक्षात प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले आहे.
“शिवसेना (शिंदे गट) मध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल,” असे आश्वासन शिवसेनेचे युवा सरपंच विकास बापू चव्हाण यांनी दिल्याचे समजते.
मात्र, याआधी अजय कांबळे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) चे नेते भालचंद्र भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्य करताना दिसले होते.
तसेच चंद्रकांत बाठे, रणजितदादा शिवतरे आणि विक्रम खुटवड या नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध असल्याचे बोलले जाते.
आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा माहोल तापत असताना, अजय कांबळे यांचा राजीनामा कोणाच्या पथ्यावर पडतो आणि त्यांच्या पुढील राजकीय पावलाने कोणाला लाभ होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पत्रकारांनी कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फक्त हलकेसे हसत एवढेच सांगितले —
“काही दिवस थांबा… सगळं स्पष्ट होईल.”
त्यांची ही मितभाषी प्रतिक्रिया राजकीय चर्चांना आणखी धार देत असून, भोर तालुक्यातील आगामी समीकरणे नेमकी कोणत्या दिशेने वळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“राजीनामा देणार हे निश्चित आहे,” असे सांगत या चर्चेला आणखी बळ दिले आहे.


