विद्यार्थ्यांना आता आधारकार्ड प्रमाणेच मिळणार अपारकार्ड (विद्यार्थी व पालक यांना माहिती देताना-मुख्याध्यापक भिमराव शिंदे)
पुण्यभूमी महाराष्ट्र न्युज
कार्यकारी संपादक: सागर खुडे
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत अपार हा उपक्रम हाती घेतला आहे,ज्यामुळे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला आधारकार्ड प्रमाणेच १२ अंकी ओळख क्रमांक (APAAR ID) आणि सोबतच डिजीलॉकरची सोय उपलब्ध करून दिली जात आहे.एक देश एक विद्यार्थी ओळख या संकल्पने अंतर्गत सर्वच विद्यार्थ्यांना अपारकार्ड दिले जाणार असून त्यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे.त्यामुळे शैक्षणिक कागदपत्रांऐवजी आता या कार्डवरच विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध असणार आहे. डिजीटल इंडिया अंतर्गत केंद्र सरकारने डिजीलॉकर तयार केले आहे.जेथे प्रत्येक भारतीय नागरिक आपली महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकतो. अशी माहिती बालवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व पालक यांना मुख्याध्यापक भिमराव शिंदे यांनी दिली.
*अपार म्हणजे काय?*
ऑटोमेटेड पर्मनंट ॲकेडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजे अपार.अपार हा देशातील पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा बारा अंकी कायमस्वरुपी ओळखक्रमांक आहे.युनिफाइड डिस्ट्रिक्ट अँड इन्फर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस म्हणजेच यू डायस पोर्टलमध्ये सध्या प्रत्येक विद्यार्थ्याची नोंदणी असून येथे त्याचा व्यक्तिगत शैक्षणिक क्रमांक (पीईएन) नोंदवलेला आहे.अपार आयडी या पीईएन ची जागा घेणार आहे.
*याचा नेमका उपयोग काय?*
शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर लागणारी अधिकृत तसेच मूळ कागदपत्रे येथे सहज उपलब्ध होणार आहेत. एखाद्या विद्यार्थ्याची शाळा बदलल्यास त्याला नव्या शाळेत सगळी कागदपत्रे जमा करण्याची गरज पडणार नाही.तसेच शैक्षणिक अधिकृत कागदपत्रे हरविल्यास त्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वाटचालीवर कोणताही परिणाम होणार नाही.कारण अपार आणि डिजीलॉकर उपलब्ध असेल.
*क्रमांक कसा मिळेल?*
अपार ओळखक्रमांकासाठी शाळांनी पालकांशी संपर्क साधायचा आहे.पालकांनीही याबाबत जागरुक असणे आवश्यक आहे.अपारसाठी यू डायस नोंदणीक्रमांक,जन्मतारीख, लिंग,मोबाईल क्रमांक, आईचे नाव,वडिलांचे नाव,आधारकार्डवरील नाव,आधार क्रमांक, आई किंवा वडील यांचे आधारकार्ड,अठरा वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी पालकांचे लेखी संमती पत्र इत्यादी बाबी आवश्यक आहेत.या सर्व बाबींची शाळांनी खात्री करायची आहे.अपार आयडी तयार झाला की तो डिजीलॉकरशी जोडला जाईल.याला एज्युलॉकर असेही म्हणतात.
डिजीलॉकर काय आहे?
डिजीटल इंडिया या उपक्रमांतर्गत केंद्राच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने डिजीलॉकर हे नागरिकांसाठी क्लाउड आधारित डॉक्युमेंट वॉलेट तयार केले आहे.शासकीय व्यवहारात कागदपत्रांचा वापर टाळणे,ही प्रक्रिया डिजीटल करणे हा मुळ आणि मुख्य उद्देश आहे.यात अधिकृत कागदपत्रे, प्रमाणपत्रे सुरक्षित ठेवली जातात.गरजेनुसार ती उपलब्ध करुन दिली जातात. डिजीलॉकरमधील कागदपत्रे ही भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा २००० नुसार अधिकृत मानली गेली आहेत.डिजीलॉकरद्वारे सादर केलेली कागदपत्रे ही मुळ कागदपत्रेच समजावीत असे कायदा सांगतो.
कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थी,पालक, सहकारी शिक्षक महादेव बदक आनंदा सावले अंजना कोंढाळकर उपस्थित होते.


