आंबेघर–हिरडोशी मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था : प्रहार जनशक्ती पक्षाकडून PWD विभागाला लेखी मागणी
मंगेश पवार
भोर :— आंबेघर ते टिटेघर, कोरले, चिखलगाव, कारी, रायरी, हिरडोशी या मार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि ग्रामस्थांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्ष तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) लेखी निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सदर रस्त्यांची दुरुस्ती काही महिन्यांपूर्वी ठेकेदारामार्फत करण्यात आली होती. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर काही काळातच रस्ते पुन्हा खराब झाले असून खड्ड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ठेकेदारांनी काम पूर्ण करून बिल घेतले असले तरी गुणवत्तेचा अभाव स्पष्ट दिसून येत आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाने या ठेकेदारांवर कारवाईची मागणी करताना म्हटले आहे की, दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारांची असून त्यांनी तातडीने कामे पूर्ण करावीत, अन्यथा होणारे अपघात किंवा नुकसान यासाठी ठेकेदार आणि संबंधित अधिकारी जबाबदार राहतील.
पक्षाने पुढे इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही केली नाही, तर प्रहार जनशक्ती पक्ष रास्ता रोको आंदोलन करेल तसेच रस्ता बंद करून ठेकेदारांकडून लेखी उत्तरे घेईल. तसेच अशा निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची मागणीही करण्यात आली आहे.
तसेच प्रहार जनशक्ती पक्षाने शासनाला आणखी एक महत्त्वाची मागणी केली आहे —
जर या रस्त्यांसाठी PWD विभागाकडून निधी उपलब्ध होणे किंवा दुरुस्ती करणे शक्य नसल्यास, तर शासनाने हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा नियोजन समितीच्या ताब्यात वर्ग करावेत, जेणेकरून तेथील जनप्रतिनिधी व नेतेमंडळी तरी सिमेंट काँक्रीटचे दर्जेदार रस्ते उभारू शकतील.
या निवेदनावर संहारक घटना नावला (सातारा) यांनी स्वाक्षरी केली असून, ही तक्रार भोर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना सादर करण्यात आली आहे.


