म्हाते खुर्द गावच्या दोन गायींचा बिबट्याने घेतला बळी.
सातारा प्रतिनिधी :सुनील धनावडे
मेढा:- म्हाते खुर्द गावचे रहिवासी सुभाष हरीभाऊ दळवी यांच्या दोन गायींचा रविवार दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी बिबट्याने बळी घेतल्याची भीषण आणि दुर्दैवी घटना म्हाते खुर्द गावच्या डोंगर भागात घडली.प्रत्यक्ष घटनास्थळी मृत गायींची पाहणी दरम्यान अत्यंत हृदयद्रावक परिस्थिती या ठिकाणी पाह्याला मिळाली.बिबट्याने या गायींवर हल्ला करून इतरत्र फरपटत नेण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे. या ठिकाणच्या आजुबाजूला मृत गायीचे अवशेष आढळून आले आहेत.म्हाते खुर्द गावातील रामचंद्र आनंदा दळवी यांची शेळीही काही दिवसांपूर्वीच वन्य प्राण्यांच्या हल्यात मृत्युमुखी पडली आहे.त्यामुळे म्हाते खुर्द गावच्या परिसरात बिबट्यांचे हल्ले करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत.आतापर्यंत जावली तालुक्यातील ब-याच पाळीव जनावरांचा त्यांनी फडशा पाडला असण्याची शक्यता आहे.म्हाते खुर्द गावच्या वनक्षेत्रात तसेच शिवारात बिनदिक्कतपणे बिबट्या वावरत आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हाते खुर्द व कै. आण्णासाहेब पाटील माध्यमिक विद्यालय म्हाते बुद्रुक या शाळांमध्ये म्हाते खुर्द मुरा या ठिकाणचे शालेय विद्यार्धी याच डोंगर भागातून दररोज ज्ञानार्जनासाठी ये-जा करीत आहेत.त्यामुळे या लहान शाळकरी मुलांमध्ये, त्यांच्या पालकांमध्ये तसेच म्हाते खुर्द ग्रामस्थांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.काही दिवसांपूर्वी मानवी वस्तीमध्ये बिबट्या एका महिलेला दिसला असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.भविष्यात मानवी वस्तीसह, शेतात जाणारी माणसे, घरी बांधलेली पाळीव जनावरे यांना बिबट्याने लक्ष्य करू नये म्हणून म्हाते खुर्द परिसरात वनविभागाने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी म्हाते खुर्द ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी केली असल्याची माहिती पत्रकार विकास दळवी यांनी दिली आहे.


