नसरापूरमध्ये २८ वर्षीय युवकाचा अचानक मृत्यू – परिसरात हळहळ


नसरापूर (ता. भोर), ४ मे: पुणे-सातारा महामार्गालगत असलेल्या नसरापूर येथे रविवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. अक्षय देविदास रिंगे (वय २८, रा. स्वामी समर्थ नगर, नसरापूर) या तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. अतिशय उमदा, हसतमुख आणि समाजाभिमुख स्वभावाचा अक्षय अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय हा रविवारी दुपारी आपल्या राहत्या घरी झोपला होता. सुमारास साडेबारा वाजण्याच्या दरम्यान झोपेतून उठत असताना त्याला चक्कर आली आणि तो अचानक खाली कोसळला. ही घटना घडताच घरातील सदस्य आणि शेजारी धावून आले. त्यांनी अक्षयला तात्काळ नसरापूर येथील सिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. प्रारंभिक अहवालानुसार, तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ADVERTISEMENT

 

या घटनेची माहिती त्याचा भाऊ हर्षल देविदास रिंगे (वय २६) याने राजगड पोलिस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

अक्षयच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सामाजिक कामात सक्रिय सहभाग असलेला, खेळाची आवड असलेला आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारा युवक अचानक काळाच्या गर्तेत हरपल्याने अनेकांचे डोळे पाणावले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!