रिलायन्सच्या दिरंगाईमुळे कापूरहोळमध्ये अपघातांची मालिका; ग्रामस्थांमध्ये संताप
संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
दि. 7 जून 25 कापूरहोळ (ता.भोर) – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील कापूरहोळ परिसरात रिलायन्स कंपनीच्या देखभाल व दुरुस्ती कामातील दिरंगाईमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, रोज अपघात घडत आहेत. स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी व सरपंचांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया नोंदवत “रस्ते वेळेवर डांबरीकरण न झाल्यास ते बंद करण्यात येतील” असा इशारा दिला आहे.
रिलायन्स कंपनीकडून सध्या महामार्गावरील अनेक ठिकाणी देखभाल व मेंटनन्सचे काम सुरू आहे. यामध्ये रस्ता खराब झालेल्या भागात मोठ्या यंत्रांच्या सहाय्याने रस्ता उकरून काढला जात आहे. त्यानंतर नव्याने डांबरीकरण केले जाते. मात्र कापूरहोळ येथे गेल्या आठवड्याभरापासून केवळ रस्ता उकरून तसाच सोडला असून, डांबरीकरणाचे कोणतेही काम झालेले नाही. परिणामी, दररोज चार ते पाच दुचाकीस्वार उकरलेल्या खड्यांमुळे घसरून पडत आहेत. अपघातांची मालिका सुरुच असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक रहिवासी, सरपंच आणि प्रवाशांनी या दिरंगाईविरोधात आवाज उठवत सोशल मीडियावरून रिलायन्स कंपनीला थेट इशारा दिला आहे. “जेव्हा पर्यंत उकरलेल्या रस्त्याचे डांबरीकरण होत नाही, तोपर्यंत हा रस्ता बंद करण्यात यावा,” अशी मागणी ठामपणे करण्यात आली आहे.
पब्लिक अंडरपासचा प्रश्नही गंभीर
याच परिसरातील पब्लिक अंडरपासमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणी साठत असून, त्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. विशेषतः शाळेतील विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना या साचलेल्या पाण्यातून वाट काढून जावे लागत आहे. याशिवाय अंडरपासमधील लाईट व्यवस्था अकार्यक्षम असून, अनेकदा दिवसा देखील अंधार जाणवतो.रस्त्याची वेळेवर कामे न केल्यास शिव प्रहार संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल. शिवप्रहार संघटना संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या मातीच्या उतारामुळे मेन रोडवरील माती सर्व्हिस रोडवर वाहून येत आहे. यामुळे वाहनचालकांना धोका निर्माण होत असून, संपूर्ण परिसर अस्वच्छ झाला आहे. या सर्व बाबींवर येत्या दोन दिवसांत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात.
पंकज बाबी गाडेसरपंच कापूरहोळ
प्रशासनाचे दुर्लक्ष?
या गंभीर समस्यांकडे संबंधित यंत्रणांचे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील नागरिकांकडून करण्यात येत आहे. कामे वेळेवर पूर्ण न झाल्यास नागरिकांच्या जीवाशी खेळ होतो आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी, ही मागणी जोर धरू लागली आहे.
प्रहार जनशक्ती पक्ष उपाध्यक्ष भोर
अजय कांबळे

 
			

 
					 
							 
							