भोरमध्ये महसूल लोकअदालतीत ५२ प्रकरणांचा निकाल
भोर प्रतिनिधी: धनाजी पवार
भोर, ९ जून – भोर येथील अभिजित मंगल कार्यालयात सोमवारी आयोजित महसूल लोकअदालतीत एकूण ५२ प्रकरणांची सुनावणी होऊन त्यांचे निकाल लावण्यात आले. या अदालतीमुळे अनेक नागरिकांना तडजोडीच्या माध्यमातून दिलासा मिळाला.
या विशेष न्यायिक उपक्रमात २२ प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये तडजोड झाली, ११ प्रकरणे मागे घेण्यात आली, तर १९ प्रकरणे निर्णयासाठी पूर्ण झाली.
या अदालतीचे आयोजन मंडल अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या प्रलंबित प्रकरणांचे तडजोडीतून निवारण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.
कार्यक्रमावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, नायब तहसीलदार अरुण कदम, तसेच प्रतिभा खाडे, मंदार नेरेकर, प्रवीण माने, शेखर जगताप, एम. ए. शेख आणि रूपाली गायकवाड हे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. खरात आणि तहसीलदार नजन यांनी यावेळी सांगितले की, अर्धन्यायिक स्वरूपाच्या प्रकरणांना जलद निकालात आणण्यासाठी ही लोकअदालत उपयुक्त ठरली आहे. तडजोडीच्या माध्यमातून न्याय मिळाल्याने दोन्ही पक्षकार समाधान व्यक्त करत आहेत.


