न्हावी (३२२) गावात बसस्टँडच्या पायाभरणीने विकासाला गती
दि. 9 सारोळे :- न्हावी ३२२ गावातील अबालवृद्ध नागरिकांना प्रवासासाठी परगावी जाताना उन्हामध्ये, पावसात उभे राहून बसची वाट पाहावी लागत होती. नागरिकांच्या या अडचणीची दखल घेत न्हावी गावातील के. गजानन एकनाथ सोनवणे यांच्या आशीर्वादाने व संदेश नामदेव सोनवणे, राजेंद्र नामदेव सोनवणे यांच्या सहकार्याने व विद्यमान सरपंच सुरेश सोनवणे उर्फ आप्पा तसेच पद्मरंग सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नातून आज दिनांक ९/९/२०२५ रोजी न्हावी येथे बसस्टँडसाठी पायाभरणी करण्यात आली.
या सोहळ्यास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बसस्टँड उभारणीमुळे प्रवाशांसह शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.
यावेळी बोलताना सरपंच सुरेश सोनवणे यांनी सांगितले की, “गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून प्रत्येक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माझ्या परीने प्रयत्न करत राहीन.”
गावातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करून सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.