“राजगड पोलिसांची कारवाई — आरपीआय अध्यक्षाकडून ५ लाखांची खंडणी, खोट्या अॅट्रॉसिटीची धमकी”
नसरापूर, दि. 11 ऑगस्ट — गराडे (ता. पुरंदर) आणि खेडशिवापुर (ता. हवेली) येथे राहते घरी अनधिकृत प्रवेश करून पाच लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरपीआय अध्यक्ष प्रदीप कांबळे (रा. कोढणपुर, ता. हवेली) व त्याचे ५ ते ६ अज्ञात साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी बाळासाहेब विश्वनाथ दूरकर (वय ६१, व्यवसाय शेती, रा. दूरकरवाडी, गराडे, ता. पुरंदर) यांच्या तक्रारीनुसार, २२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते आजपर्यंत आरोपींनी वारंवार धमक्या देत ५ लाख रुपये देण्याची मागणी केली. फिर्यादींच्या मालकीच्या जमिनीतून गेलेल्या रिंगरोडच्या मोबदल्यात शासनाकडून मिळालेल्या रकमेपैकी ही रक्कम देण्याचा दबाव टाकण्यात आला.
पैसे न दिल्यास “तुला बघून घेतो, तुझ्यावर खोटी अॅट्रॉसिटी केस टाकतो” अशा धमक्या देण्यात आल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
या प्रकरणी तपास पो.नि. गवळी सो यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


