लोणंद पोलिसांची दमदार कारवाई मोबाईल चोरी प्रकरण उघडकीस – तब्बल २० मोबाईल जप्त, दोन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या
संपादक दिलीप वाघमारे
लोणंद शहरातील आठवडी बाजारात वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांना आळा बसावा म्हणून लोणंद पोलिसांनी आखलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी मध्यप्रदेशातील दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्या कडून तब्बल २० मोबाईल हँडसेट्स हस्तगत केले असून, या मोबाईलची एकूण किंमत ४ लाख ६० हजार रुपये इतकी आहे.
घटना अशी
दिनांक ४ सप्टेंबर रोजी लोणंद शहरातील गुरुवारच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीची घटना घडली. गर्दीच्या वेळी लोकांच्या खिशातून मोबाईल चोरण्याच्या तक्रारींनी नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर लोणंद पोलिसांनी विशेष पथक तयार करून बाजार परिसरात गस्त वाढवली.
सदर मोहिमेत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे चार मोबाईल सापडले. पुढील तपासात या दोघांनी मोबाईल चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण २० मोबाईल जप्त करण्यात आले.
अटक संशयित आरोपींची माहिती
करुडसिंह भगवानसिंह राठोड (वय २८, रा. पिरजहाल, जि. उज्जैन, मध्यप्रदेश) कांचु सोनु गुजर (वय २२, रा. रावत, जि. इंदौर, मध्यप्रदेश) हे दोघे काही दिवसांपासून पुण्यातील भोसरी डेपो परिसरात वास्तव्यास होते.
५ सप्टेंबर रोजी त्यांना अटक करून तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. तपासादरम्यान त्यांच्याकडून तब्बल २० मोबाईल हस्तगत करण्यात आले. न्यायालयाने संशयित .आरोपींची पोलीस कोठडी ११ सप्टेंबरपर्यंत वाढवली असून, आणखी चोरीचे मोबाईल मिळण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या कारवाईला वरिष्ठांचे मार्गदर्शन
या कारवाईसाठी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी श्री. विशाल खांबे यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी ही कारवाई यशस्वी केली.
कारवाईत सहभागी पथक
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक रोहित हेगडे, सहा. पो.उपनिरीक्षक विष्णु धुमाळ, विजय पिसाळ, पोलीस हवालदार धनाजी भिसे, नितीन भोसले, राहुल मोरे, सतिश दडस, बापुराव मदने, विठ्ठल काळे, अंकुश कोळेकर, अमोल जाधव, अवधुत धुमाळ, सचिन कोळेकर, शेखर शिंगाडे, जयवंत यादव, संजय चव्हाण, स्नेहल कापसे, राणी कुदळे, अश्विनी माने, आशा शेळके, भारती मदने, लता निकम, रुतुजा शिंदे आदींनी सहभाग घेतला. तपास पो.हवा. नितीन भोसले करीत आहेत.
कौतुकाची थाप
मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीचे प्रकरण उघडकीस आणत २० मोबाईल हस्तगत करणाऱ्या लोणंद पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांनाही पोलिसांचा आत्मविश्वास वाटू लागला आहे.