पुणे- सातारा महामार्गावर सारोळे येथे ज्येष्ठ नागरिकाला अज्ञात वाहनाची धडक; गंभीर अपघातात मृत्यू
सारोळे :- दि. ७ मे २०२२ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास मौजे सारोळे (ता. भोर) येथे एक दुर्दैवी अपघात घडला. अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत एका ७५ वर्षीय वृद्ध पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना रामेश्वर पेट्रोल पंपासमोरील सातारा-पुणे महामार्गावर घडली.
मयत इसम महामार्गाने पायी जात असताना, पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात वृद्ध इसमाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर संबंधित वाहन चालक अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून फरार झाला.
या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 230/2025 अन्वये भा.दं.वि. कलम 304A, 279, 337, 338 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134/177 अंतर्गत अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नाना मदने करीत असून, नागरिकांना घटनास्थळी उपस्थित कोणी साक्षीदार असेल त्यांनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन नाना मदने यांनी केले आहे.


