३३ वर्षांच्या प्रामाणिक सेवेची गौरवशाली सांगता!जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवळे येथे भगवंत मडके सर यांचा भावुक सेवापूर्ती समारंभ संप्पन्न.
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
दिवळे (ता. भोर) – ३३ वर्षे प्रामाणिक आणि निष्ठेने शैक्षणिक सेवा बजावून आदरणीय भगवंत मडके सर यांनी आपल्या गौरवशाली सेवेला निरोप दिला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवळे येथे त्यांचा भावुक आणि प्रेरणादायी सेवापूर्ती समारंभ उत्साहात पार पडला.

मडके सर यांनी ३ जुलै १९९२ रोजी नाशिक विद्यापीठात सेवेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी जि.प. केंद्र शाळा निवळे (ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर), केंद्र शाळा परळे निनाई, जि.प. शाळा वाघजवाडी (ता. भोर), केंद्र शाळा वाढणे, सिद्धेश्वर नगर वाघजवाडी आणि अखेर दिवळे शाळा येथे आपल्या कर्तव्यदक्षतेचा ठसा उमटवत ३३ वर्षांची अखंड शिक्षणसेवा केली. त्यांच्या कार्यकाळात पत्नी आशा भगवंत मडके यांची खंबीर साथ लाभली, हे उल्लेखनीय आहे.
या समारंभास तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मा. मनोजकुमार बामणे सर, भोर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील लेखावळे, नेते चांगदेव नाना मसूरकर, महिंद्रा सावंत, कमलाकर मोहिते, धनंजय भिलारे, शशिकांत गुरव यांच्यासह अनेक मान्यवर, सहकारी शिक्षक, सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय पांगारे सर त्याचबरोबर व्हाईस चेअरमन साळवी सर तसेच ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल पवार सरांनी अत्यंत प्रभावी व सुंदररित्या पार पाडले. मडके सर यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अनेक सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्याची आणि साधेपणाची आठवण करत भावनिक शब्दांत शुभेच्छा दिल्या.

 
			

 
					 
							 
							