गहाळ झालेली ५ तोळ्यांची सोन्याची साखळी, मोबाईल व रोकड परत! राजगड पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी
दि. 28 नसरापूर (भोर) – प्रवासादरम्यान गहाळ झालेली ५ तोळ्यांची सोन्याची साखळी, मोबाईल व रोख रक्कम राजगड पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोधून काढत तक्रारदाराच्या ताब्यात सुपूर्द केली. या उत्कृष्ट कार्याबद्दल तक्रारदार महिला रंजना रविंद्र पाटील यांनी राजगड पोलिसांना पेढे भरवून आभार व्यक्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ एप्रिल रोजी रात्री रंजना पाटील या शिगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथून पुण्याकडे कारने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान केळवडे (ता. भोर) येथे पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आले की कारच्या डिकीत ठेवलेली पर्स गायब आहे. पर्समध्ये ५ तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, Samsung मोबाईल व ३,००० रूपये रोख होती.
रंजना पाटील यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी राजगड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ तांत्रिक तपास सुरू केला. मोबाईलचे लोकेशन सांगोला येथे आढळल्यावर गोपनीय बातमीदाराच्या मदतीने सदर बॅग मिळवण्यात पोलिसांना यश आले. बॅगेत संपूर्ण वस्तू जशाच्या तशा मिळून आल्या.
सदर कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, पो.उपनिरीक्षक अजित पाटील, महिला पो.अं. पूनम मांगले, पोलीस अंमलदार नाना मदने, मयुर निंबाळकर, अक्षय नलावडे, मंगेश कुंभार व अजय चांदा यांचा सक्रिय सहभाग होता.
या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, तसेच उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी टीमचे विशेष कौतुक केले आहे.


