पावसाचा फटका – भोर तालुक्यात खरीप हंगाम शेतकरी संकटात शिव प्रहार प्रतिष्ठान व बळीराजा शेतकरी संघटनेचे संयुक्त निवेदन
दि. 30 जुलै भोर :- ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी – संतोष मोहिते व श्यामसुंदर धायगुडे, सरपंच गणेश साळुंखे यांची मागणी
भोर तालुक्यात यावर्षी पावसाच्या अनियमित आणि सततच्या धार स्वरूपाच्या पावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, संपूर्ण हंगाम हातातून निसटल्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक गणिताचं कंबरडं मोडलं असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी शिव प्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व बळीराजा शेतकरी संघटना यांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत दोन्ही संघटनांनी उपविभागीय अधिकारी भोर, तहसीलदार भोर, कृषी व वन विभाग यांना दोन स्वतंत्र निवेदने सादर केली. या निवेदनाद्वारे तालुक्यातील खरीप पिकांची तातडीने पाहणी करून वास्तविक पंचनामे करण्याची आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
1. यावर्षी पावसाची सुरुवात वेळेआधी झाल्याने 60 ते 70 टक्के क्षेत्राची मशागतच होऊ शकली नाही.
2. काही शेतकऱ्यांनी वापशावर पेरण्या केल्या मात्र सततच्या पावसामुळे 40% पेक्षा कमी उगम झाला. दुबार पेरणीनंतरही उगम न झाल्याने अनेकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे.
3. भुईमुगावर वांबीर्या रोग, सोयाबीनची वाढ खुंटली, पिके पिवळी पडली आहेत.
4. बागायती क्षेत्रात फळपिके, भाजीपाला सततच्या पावसामुळे सडून गेले
5. भात रोपे व्यवस्थित उगवली नाहीत, बाहेरून विकत आणून लागवड केल्यानंतरही शेवाळ्याचा प्रादुर्भाव व वाल्यांचे नुकसान.
6. रानडुक्कर, मोर, गोगलगाय व बिबट्या यांच्या हल्ल्यांमुळे पिके, फळबागा, व जनावरांचे मोठे नुकसान.
7. महसूल विभागाच्या ऑनलाईन प्रणालीतील अडचणींमुळे अनेक पीक नोंदी झालेल्या नाहीत.
आर्थिक फटका आणि कर्जाचा बोजा
शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे यासाठी कर्ज घेतले आहे. अनेकांनी सोने तारण, पीककर्ज, कृषी सेवा केंद्रांमधून उधारी घेतली आहे. पण उत्पादन न झाल्याने हे भांडवलही परत मिळणार नाही, ही गंभीर अवस्था आहे.
प्रशासनास दिलेल्या प्रमुख मागण्या :
महसूल, कृषी व वन विभागाने तातडीने शेती शिवारात जाऊन पंचनामे करावेत.
खरीप नुकसानीचा तपशीलवार अहवाल शासनास सादर करावा.
यावेळी निवेदन देताना सरपंच गणेश साळुंखे यासह शिव प्रहार प्रतिष्ठान संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
भोर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.
१९ ऑगस्टपासून टाळेबंदी आंदोलनाचा इशारा
संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, निवेदन दिल्यानंतर २१ दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास, १९ ऑगस्ट २०२५ रोजी उपविभागीय कार्यालय भोर येथे टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल.


