भोर तालुक्यातील वेळू येथे १४ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; शाळेतून घरी आल्यानंतर गळफास घेतला
वेळू (ता. भोर) पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज)
भोर तालुक्यातील वेळु येथील साईकृपा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सुचिता चंद्रहास मेहेर असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती इयत्ता आठवी मध्ये शिकत होती,शाळेतून घरी परतल्यानंतर काही वेळातच ही दुर्दैवी घटना घडली.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास, सुचिता शाळेतून घरी परतली. तिच्या कुटुंबातील सर्वजण कामानिमित्त बाहेर गेले होते. ती शेजारील खोलीतून चावी घेऊन घरात गेली होती. काही वेळाने तिची मावशी सुरेखा मेहेर घरी आली असता दरवाजा आतून बंद होता. दरवाजावर टकटक केल्यानंतर प्रतिसाद न मिळाल्याने तिने खिडकीतून डोकावून पाहिले असता, सुचिता हिने घरातील पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
आरडाओरड ऐकून शेजारील रामेश्वर मुंडे व पवन घाडगे यांनी इतरांसोबत मिळून दरवाजा तोडला व तिला खाली उतरवून श्रीयश हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून सायंकाळी ७ वाजता मृत घोषित केले.
सुचिताने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार बरकाले तपास करत आहेत.


