भोंगवली पंचायत समिती सदस्यपदासाठी हर्षद बोबडे मैदानात — जनसंपर्क, समाजकार्याचा ठसा उमटविणार
मंगेश पवार
दि. 13 सारोळे :- भोंगवली गणातून यंदा पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक रंगणार असून, राजापुर गावचे सुपुत्र आणि माजी सरपंच चंद्रकांत बोबडे यांचे चिरंजीव हर्षद बोबडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरायची घोषणा केली आहे. समाजकार्य, जनसंपर्क आणि विविध उपक्रमांतून त्यांनी ग्रामीण भागात वेगळा ठसा उमटविला आहे.
कुलदिपतात्या युवा मंचच्या माध्यमातून हर्षद बोबडे यांनी ग्रामस्थांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. नारी शक्ती उपक्रमांतर्गत महिलांसाठी शिलाई मशीनचे फॉर्म भरून, मशिन वितरणाचे आयोजन, मोरवाडी, पाचलिंगे, निगडे, केंजळ, राजापुर परिसरातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले.
ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सोयींसंदर्भात पीडब्ल्यूडी व एमएसबी यांना निवेदन देऊन प्रश्न मार्गी लावले. तसेच राजगड सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आणि कामगारांच्या पगाराच्या मागणीसाठी कुलदिप कोंडे यांच्या सोबत आंदोलनही केले.
हर्षद बोबडे हे शिक्षकी पेशात असूनही ग्रामस्थांच्या सुखदुःखात सहभागी होतात. सारोळा गावचे जावई म्हणून तसेच इतर गावांतील नातेसंबंधातून त्यांनी मजबूत जनसंपर्क निर्माण केला आहे. यंदा ते शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे, कुलदिपतात्या कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढविणार आहेत.
“जनतेचा पाठिंबा, मित्रपरिवाराची साथ आणि कुलदिपतात्यांचे मार्गदर्शन यामुळे मी ही निवडणूक सहज जिंकणार, असा मला पूर्ण विश्वास आहे,” असे हर्षद बोबडे यांनी सांगितले.


