भोर तालुक्यातील मंडल किकवी येथे 18 ऑगस्टला ‘लोकशाही दिन’ — शेतकरी व नागरिकांसाठी एकाच छताखाली मिळणार सरकारी सेवा.
मंगेश पवार
भोर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मंडल किकवी अंतर्गत शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजना व सेवा सुलभरीत्या उपलब्ध करून देण्यासाठी येत्या 18 ऑगस्ट 2025 (सोमवार) रोजी लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम सकाळी 11 वाजता ते दुपारी 5 वाजेपर्यंत शिव मंगल लॉन, मौजे पांडे येथे पार पडणार आहे.
या उपक्रमामध्ये नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजांच्या विविध शासकीय सेवा एकाच छताखाली व त्याच दिवशी मिळणार आहेत. या सेवांमध्ये —
आधार कार्ड अपडेट
उत्पन्न दाखले काढणे
७/१२ व ८अ उतारे मिळवणे
वारस नोंदणी प्रक्रिया
फार्मर आयडी (AgriStack) नोंदणी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
लक्ष्मी मुक्ती योजना
संजय गांधी निराधार योजना
श्रावण बाळ योजना
यावेळी मंडल किकवी अंतर्गत महसूल विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती, समाजकल्याण, महिला व बालविकास विभाग, तसेच इतर संबंधित शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून थेट नागरिकांना सेवा देणार आहेत.
लोकशाही दिनाचे उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना शासन दरबारी वारंवार चकरा न मारता सर्व सेवा त्यांच्या गावाजवळ व एका दिवसात उपलब्ध करून देणे, असे आयोजकांचे म्हणणे आहे.
“शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन अजय कांबळे, अध्यक्ष – प्रहार जनशक्ती पक्ष भोर यांनी केले आहे.


